करमाळ्यात पाटील-जगताप-शिंदे-बागल गटाची प्रतिष्ठा पणाला ! बाजी कोण मारणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष 

अण्णा काळे 
Wednesday, 13 January 2021

तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कायम एकमेकांच्या विरोधात लढणारे माजी आमदार नारायण पाटील गट व बागल गट हे बहुसंख्य ठिकाणी एकत्र आले आहेत. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आलेले आमदार संजय शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप गट हे ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढत आहेत. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत .या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मांगी, पोथरे, देवळाली, झरे, सावडी, साडे, जातेगाव, कुंभेज, गुळसडी या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कायम एकमेकांच्या विरोधात लढणारे माजी आमदार नारायण पाटील गट व बागल गट हे बहुसंख्य ठिकाणी एकत्र आले आहेत. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आलेले आमदार संजय शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप गट हे ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढत आहेत. हे चित्र अपवादात्मक ग्रामपंचायतींमध्ये वगळता सर्वत्र दिसून येत आहे. तर काही ग्रामपंचायतींमध्ये पाटील - बागल- शिंदे- जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी सोयीनुसार एकत्र येत पॅनेल उभे केले आहेत. 

करमाळा तालुक्‍यात अनेक ग्रामपंचायतींवर पाटील, बागल, जगताप यांची सत्ता आहे. 2014 पासून शिंदे गटाने तालुक्‍यात प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय शिंदे आमदार झाल्यापासून त्यांच्या गटाच्या नावाने निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत असून, या निवडणुकीमध्ये त्याला यश आले आहे. 
देवळाली ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता आहे. येथे अनेक वर्षे बागल गटाची सत्ता होती. याही वेळेस या ग्रामपंचायत निवडणुकीत बागल विरुद्ध पाटील असा थेट सामना होत असून, जगताप व शिंदे यांचे कार्यकर्ते सोयीनुसार भूमिका घेऊन निवडणुकीत उतरले आहेत. पंचायत समितीचे विद्यमान सभापती गहिनीनाथ ननवरे हे या निवडणुकीत सक्रिय आहेत. तर माजी सभापती कै. कल्याण गायकवाड यांचे चिरंजीव आशीष गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील बागल गटाकडून निवडणूक लढवली जात आहे. 

मांगी ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षांपासून बागल गटाचे वर्चस्व आहे. येथे माजी राज्यमंजी कै. दिगंबर बागल यांच्यापासून बागल गटाची एकहाती सत्ता आहे, मात्र या निवडणुकीत आमदार शिंदे गटाने बागल यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आमदार शिंदे गटाचे सुजित बागल यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने येथे मोठी ताकद लावली आहे. 

पश्‍चिम भागातील सावडी ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची होत आहे. सध्या येथे बागल व पाटील गटाची सत्ता आहे. सावडीत बागल - पाटील विरुद्ध शिंदे गट अशी निवडणूक होत आहे. माजी सरपंच काशिनाथ काकडे, माजी आमदार नारायण पाटील समर्थक उपसरपंच महादेव श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखालील पाटील - बागल गट विरुद्ध माजी सरपंच सतीश शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट अशी ही निवडणूक होत आहे. पाटील गटाचे काही कार्यकर्ते सतीश शेळके यांच्याबरोबर काम करत आहेत. 

साडे ग्रामपंचायत निवडणुकीतही मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत माजी सरपंच दत्ता जाधव हे शिंदे गटाचे नेतृत्व करत आहेत. येथे शिंदे - जगताप विरुद्ध पाटील - बागल असा सामना होत आहे. या ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 

झरे ग्रामपंचायतीने या वेळी सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथे विधानसभा निवडणुकीला माजी आमदार पाटील यांना मोठे मताधिक्‍य मिळाले होते. या ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. विलास पाटील यांचे नातू प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. तर पाटील यांची सत्ता घालवण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब गुळवे, नारायण अंब्रुळे, शेतकरी बाळासाहेब गायकवाड, विलास चौधरी हे एकत्र आले असून, त्यांनी स्थानिक पातळीवर गट - तट विसरून जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेल तयार करून ही निवडणूक लढवत आहेत. प्रशांत पाटील यांनी तरुणांना जवळ करत जोतिर्लिंग लोकसेवा पॅनेलच्या माध्यमातून उमेदवार दिले आहेत. 

गुळसडी ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील - बागल - शिंदे - जगताप यांनी एकत्र येत निवडणुक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. तसे 9 जागांसाठी 9 उमेदवारही काढले, मात्र शेवटच्या दोन दिवसात आमदार संजय शिंदे समर्थक युवा नेते शिवाजी पाटील यांनी, आम्हाला विचारात न घेता सर्व चालले आहे म्हणून पॅनेल उभा केला. त्यामुळे येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. नारायण खंडागळे यांच्या पत्नी सिंधू खंडागळे यांची एकच जागा बिनविरोध निघाली, बाकी 8 जागांवर निवडणूक लागली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting in large groups in Gram Panchayat elections in Karmala taluka