परिस्थितीशी लढल्या आता कर्करोगाशी करताहेत दोन हात, पाटील लंच होमच्या प्रविणा पाटील यांची उत्तुंग भरारी 

प्रमोद बोडके
Saturday, 17 October 2020

मला दोन्ही मुलेच आहेत. मला मुलगी नसल्याची उणीव भासते. एखाद्या महिलेवर व मुलीवर वाईट वेळ आल्यास मी तिच्यात माझी मुलगी पाहते. तिच्या मदतीला धावून जाते. आपल्या संस्कृतीत अन्नदानाला अधिक महत्व आहे. आमच्या लंच होममध्ये अनेक निराधार, गरजू व्यक्ती येतात. त्यांना पोटभर अन्न आम्ही देतो. लॉकडाऊनमध्ये फूड बॅंकेच्या माध्यमातून निराधारांना अन्नदान करुन आम्ही खारीचा वाटा उचलला. 
- प्रविणा पाटील, पाटील लंच होम 

सोलापूर : त्या मूळच्या बेंगलोरच्या. लग्नानंतर त्या कामती येथे सासरी आल्या. लग्न झाल्यानंतर सासरची परिस्थिती बदलली. दुष्काळ आणि आजारपणात कर्जबाजारीपणा आला. उदरनिर्वाहासाठी त्या सोलापुरात आल्या. लग्नापूर्वी त्यांना फक्त भात एवढाच जेवणाचा मेन्यू बनविता येत होता. पण म्हणतात ना माणसाचा सर्वात मोठा गुरु हा त्या व्यक्तीवर आलेली परिस्थिती असते. त्याच परिस्थतीने त्यांना शिकविले. परिस्थितीसोबत त्या लढल्या, शिकल्या आणि त्यातून त्यांनी सोलापुरातील प्रसिध्द पाटील लंच होमचा विस्तार केला. 

चित्रपटाला शोभावी अशी संघर्षकथा आहे सोलापुरातील महापौर बंगल्यासमोर असलेल्या पाटील लंच होमच्या प्रमुख प्रविणा हर्षवर्धन पाटील यांची. शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या घरगुती चवीसाठी पाटील लंच होम प्रसिध्द आहे. 1994-1995 मध्ये सोलापुरात आलेल्या प्रविणा पाटील यांनी सुरुवातीला नाश्‍ता सेंटर सुरु केले. खवय्यांकडून 

मिळालेल्या प्रतिसादावर त्यांनी खानावळीची सुरुवात केली. काही वर्ष त्यांनी काळा मसाला तयार करुन विक्री करण्याचाही व्यवसाय केला. दोन डब्यांवरुन झालेली पाटील लंच होमची सुरवात दिवसाला तीनशे डब्यांवर गेली. त्यांच्या या व्यवसायातून सोलापुरातील 18 महिलांना रोजगार मिळाला आहे. परिस्थितीशी दोन हात करुन जिंकलेल्या पाटील गेल्या दहा वर्षांपासून कर्करोगाशीही संघर्ष करत आहेत.

त्यांना रोहन आणि प्रणव ही दोन मुले असून रोहन यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डी फॉर डोसा नावाचे स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. प्रणव यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन पाटील लंच होमच्या कामात ते आईला मदत करतात. आलेल्या परिस्थितीचा जिद्दीने कसा सामना करायचा? याचे उदाहरणच पाटील यांनी घालून दिले आहे. 

  • पाटील लंच होमची वाटचाल 
  • सात रुपयांपासून झाली थाळीची सुरुवात 
  • लंच होमच्या माध्यमातून 18 महिलांना मिळाला रोजगार 
  • दररोज तीनशे लोक घेतात जेवणाचा अस्वाद 
  • दरमहा होते पन्नास ते साठ हजारांची उलाढाल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting the situation, now fighting with cancer, Pravina Patil of Patil Lunch Home