नर्सला शिवीगाळ, धक्काबुक्की; वाचा सोलापुरातील गुन्हेगारी

प्रमोद बोडके 
Monday, 7 September 2020

सोलापुरातील सद्‌गुरू नगर येथील हकीम हॉल जवळील एस. एस. लॉनच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेतील पत्रा शेडमध्ये घरगुती गॅसचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश रघुनाथ खेडकर यांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

सोलापूर : सोलापुरातील घोंगडे वस्ती येथील कोडकौन मठ येथील नागरी आरोग्य केंद्रात सेवेला असलेल्या नर्सला धमकी देणे, आरोग्य केंद्रात गोंधळ घालणे, रजिस्टर फेकून धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोग्य केंद्रातील नर्स सपना रमेश खैरे (वय 27, रा. अशोक चौक) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून रुकसाना इरफान इनामदार, सुलतान दावलसा इनामदार, सलमान पटेल, सलमान पटेल यांची पत्नी (सर्व रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गॅसच्या गैरवापर प्रकरणी कारवाई 
सोलापुरातील सद्‌गुरू नगर येथील हकीम हॉल जवळील एस. एस. लॉनच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेतील पत्रा शेडमध्ये घरगुती गॅसचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश रघुनाथ खेडकर यांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्वर शब्बीर वड्डो (वय 37, रा. चंद्रकला नगर, नई जिंदगी) व अश्‍फाक अब्दुल रहमान फुलमाडी (वय 41, रा. महातम नगर, रफाई चौक, मजरेवाडी) यांच्याविरोधात अत्यावश्‍यक वस्तू अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन गॅस टाक्‍या, एक इलेक्‍ट्रिक वजन काटा, इलेक्‍ट्रिक मोटर असा 10 हजार रुपयांचे साहित्य ताब्यात घेतले आहे. 

अनधिकृत वाळूप्रकरणी गुन्हा 
शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता वाळू चोरी व विक्री केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तलाठी अमोल पांडुरंग कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ जानराव (वय 26, रा. सोलापूर), लखन कांबळे (रा. सोलापूर) यांच्या विरोधात खाण आणि खनिज नियम आणि विकास अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी पाऊण ब्रास वाळू, विना क्रमांकाचा टेम्पो असा एक लाख सात हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दुसऱ्या प्रकरणात परशुराम शिवाजी भालेराव (रा. वीटभट्टी जवळ, डोणगाव), सनी दशरथ गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पावणेदोन ब्रास वाळू, विना क्रमांकाचा टेम्पो असा दोन लाख 67 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case of abusing and pushing a nurse