टेंभू योजनेतून सांगोल्यातील बंधारे भरून द्या, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सांगली जिल्हा प्रशासनाला पत्र 

प्रमोद बोडके
Friday, 12 June 2020

सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. सध्या या भागात माणसांसाठी व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. भविष्यातील टंचाई परिस्थिती रोखण्यासाठी व पिण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी माण नदीवरील सर्व बंधारे टेंभू योजनेच्या पाण्यातून तत्काळ भरून मिळावेत. माण नदीमध्ये पाणी येईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे. 
- दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 

सोलापूर : सांगोला तालुक्‍यातील सध्याची पाणीटंचाई व दुष्काळी स्थिती लक्षात घेता या तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्यासाठी, पशुधनासाठी टेंभू योजनेतून माण नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत अशी मागणी माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतचे पत्र सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे. 

टेंभू योजनेतून सांगोला तालुक्‍यातील बलवडी, नाझरे, वझरे, चिनके, अनकढाळ, वाटंबरे, मंगेवाडी, कमलापूर, अकोला, वासुद, कडलास, वाढेगाव, सांगोला, सावे, बामणी, मांजरी, देवळे, मेथवडे माण नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे हे सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत. सांगोला तालुक्‍यातील 81 गावांसाठी असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पिण्याची पाण्याची योजना सतत बंद असते. या योजनेचा कधी विद्युत पुरवठा खंडित होतो तर इतर कारणास्तव ही योजना बंद असते. त्यामुळे सांगोला तालुक्‍यातील या गावांना पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नसल्याचे माजी आमदार साळुंखे यांनी सांगितले. 

या भागातील नागरिक, पशुधन यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या बंधाऱ्यांना टेंभू योजनेतून तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी आमदार साळुंखे यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत हा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सांगोला तालुक्‍यातील सध्याची पाणी टंचाई, संभाव्य दुष्काळी परिस्थिती पाहता टेंभू योजनेतून बलवडी पासून मेथवडे पर्यंतचे माण नदीवरील सर्व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे त्वरित भरून देण्याबाबत सांगलीच्या जलसंपदा विभागाला आपल्या स्तरावरून आदेश करावेत अशी विनंती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fill Sangola dams through Tembhu scheme, letter from Solapur Collectorate to Sangli district administration