अकलूजमध्ये सोन्याचांदीच्या दुकानात फिल्मीस्टाईल चोरीचा थरार 

शशिकांत कडबाने 
Friday, 11 September 2020

दुकान मालकाने प्रसंगावधान राखून हत्यार हिसकावून घेत आरडाओरडा करताच दोघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमलेल्या लोकांनी एकाला पकडले तर दुसरा पळून गेला असून दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

अकलूज (सोलापूर) : येथील सोन्या-चांदीच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोघांपैकी एकाने दुकानाच्या मालकाला हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकान मालकाने प्रसंगावधान राखून हत्यार हिसकावून घेत आरडाओरडा करताच दोघांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमलेल्या लोकांनी एकाला पकडले तर दुसरा पळून गेला असून दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन अकलूज पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. 
बंडू दुधाट (रा. तांदुळवाडी, ता. माळशिरस) यांचे अकलूज येथील नवीन बसस्थानका शेजारील गुळवे शॉपिंग सेंटरमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे. गुरुवार (ता. 10) रोजी नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार उरकून सायंकाळी दुकान बंद करण्यासाठी आवराआवर करीत असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या स्थितीत दोघेजण दुकानात आले व त्यांनी चांदीचे ब्रासलेट घ्यायचे आहे, ते दाखवा म्हणाले. त्यानुसार 4 ते 5 ब्रासलेट दाखविली. त्यांनी ब्रासलेट नको चांदीची अंगठी दाखवा म्हणाल्यावर अंगठ्याही दाखविल्या. परंतु परत ते दोघे ब्रासलेटच दाखवा, असे म्हणाले. त्या दोघांच्या हावभावावर दुधाट यांना संशय आल्याने त्यांनी दुकान बंद करायची वेळ झाली आहे, बाहेर चला असे म्हणताच त्या दोघांतली सज्जन कोंडिबा पवार (वय 35, दत्तनगर, खंडाळी) याने पिशवीतून पिस्टलसारखे काळ्या रंगाचे हत्यार बाहेर काढून दुधाट यांच्या दिशेने रोखत दमदाटी केली. दुधाट यांनी प्रसंगावधान राखून आरोपीच्या हातातील ते हत्यार हिसकावून घेतले असता त्याने सोबतच्या दुसऱ्या आरोपीस दुसरे हत्यार काढ म्हणताच दुधाट यांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली. यामुळे बाहेरील लोक दुकानात येवू लागले, हे पाहताच ते दोघे पिशवी दुकानातच टाकून पळू लागले. जमलेल्या नागरिकांनी सज्जन पवार याला पकडले तर दुसरा अनोळखी चोरटा पळून गेला. त्यांनी दुकानात टाकलेली पिशवीची पहाणी केली असता त्यात धारदार चाकू तसेच मोटर सायकलच्या मागील व पुढील एमएच 11/बीएफ 8473 या नंगरची प्लेट आढळून आली. याबाबत बंडू दुधाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत निकम हे करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filmstyle burglary at a gold and silver shop in Akluj