ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची आर्थिक कोंडी

Financial dilemma for parents due to online education
Financial dilemma for parents due to online education

करमाळा (सोलापूर) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थ्यांना घरातच शिक्षण देता यावे याकरिता शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, दीक्षा ऍप, झुम ऍप आदीच्या माध्यमातून शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरवात केली आहे. व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून पालकांचे ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम अनेक शाळांनी सुरू केला आहे. त्यामुळे अँड्रॉइड मोबाईल वापरण्याची ऐपत नसताना आपल्या पाल्याला ऑनलाइन शिक्षण घेता यावे याकरिता पालक अँड्रॉइड मोबाईल खरेदी करत आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मोबाईल खरेदीचे प्रमाण यंदा दुपटीने वाढले आहे. 
कोरोनाने अनेकांच्या हाताला काम नाही. ग्रामीण भागात सध्या खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. तरीही आपल्या पाल्याला ऑनलाइन शिक्षण घेता यावे याकरिता पालकांनी अँड्रॉइड मोबाईल खरेदीवर भर दिला. त्यामुळे लॉकडाउन काळात आर्थिक अडचणी असताना पालक केवळ ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे. दरवर्षी 15 जूनला सर्व शाळा सुरू होतात. मात्र, जून महिना संपत आला तरी अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. पर्याय म्हणून व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरातच शिक्षण देण्यावर भर देत आहे. मात्र, सर्वच पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे कसलेच मोबाईल नाहीत. मात्र, आपल्या मुला-मुलीच्या ऑनलाइन शिक्षणासाठी लॉकडाउन काळातही मोबाईल दुकानात गर्दी दिसत असून तुलनेत मोबाईलची विक्री दुप्पटीने वाढली आहे. 
मोबाईल खरेदीसाठी पालक उसनवारी करत आहेत. अनेक पालक कर्ज काढत आहेत. सक्तीचे आणि मोफत शिक्षण उपलब्ध असतानाही कोरोना असल्याने शिक्षणासाठी पालकांच्या खिशाला झळ बसत आहे. 

मोबाईल विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली 
डिजिटल शिक्षण पद्धतीवर जोर दिल्याने निश्‍चितच मोबाईल दुकानांत गर्दी आहे. अनेक पालक फक्त मुलांच्या शिक्षणासाठी मोबाइल खरेदी करत आहेत. साधारणपणे आठ ते 12 हजाराच्या दरम्यानचे मोबाइल खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर दिसत आहे .या दिवसांत दरवर्षीपेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक ग्राहक मोबाइल खरेदीवर जोर देत आहेत. 
- बसवराज चिवटे, मोबाईल विक्रेते, करमाळा 

पालकांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप 
मागील चार महिन्यांपासून शाळा बंद आहेत. दरवर्षी जून महिना उजाडला की शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची शाळेच्या दृष्टीने लगबग सुरू असते. यावर्षी मात्र अद्याप शाळा केव्हा सुरू होतील हे सांगता येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांना काही का होईना शिक्षण देता यावे याकरिता प्रत्येक वर्गातील पालकांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून त्या त्या विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पाठविण्याचा प्रयत्न करत आहेत. 
- पोपट कापले, मुख्याध्यापक, महात्मा गांधी विद्यालय, करमाळा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com