esakal | अन्‌ अग्निशामक दलाची गाडीच एमआयडीसीतून गायब ! मूलभूत सुविधांचा अभाव; 29 वर्षांपासून उद्योजकांकडून प्रतीक्षा 

बोलून बातमी शोधा

Fire Brigade}

गत महिन्यात एमआयडीसीतील पाणी टाकीनजीक तात्पुरते अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी राजकीयस्तरावर प्रयत्न सुरू झाले. आमदार प्रणिती शिंदे व भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी याकरिता स्वतंत्रपणे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यानुसार एमआयडीसीमध्ये अग्निशामक दलाचे तात्पुरते केंद्र उभारण्याचे निश्‍चित झाले. 

अन्‌ अग्निशामक दलाची गाडीच एमआयडीसीतून गायब ! मूलभूत सुविधांचा अभाव; 29 वर्षांपासून उद्योजकांकडून प्रतीक्षा 
sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये अग्मिशामक दलाचे तात्पुरते केंद्र उभारण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या दोन लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला. मात्र मूलभूत सुविधांची पूर्तता होण्याआधीच श्रेय घेण्यासाठी केंद्राचा उद्‌घाटन सोहळा एक दिवसाच्या अंतराने स्वतंत्रपणे उरकून घेतला. यानंतर या केंद्रातील अग्निशामक गाडी गायब झाल्याने उद्योजकांमधून आश्‍चर्य व नाराजी व्यक्‍त होत आहे. 

शहराची हद्दवाढ होण्यापूर्वी अक्कलकोट रोड एमआयडीसी शहराबाहेर होती. 1992 मध्ये झालेल्या हद्दवाढमध्ये ही एमआयडीसी शहर हद्दीत आली. हद्दवाढीला 29 वर्षे होऊनही या एमआयडीसीमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. उद्योगांसाठी आवश्‍यक असलेल्या पाण्यासह अन्य मूलभूत सुविधांची पूर्तता महापालिकेकडून नीट होत नसल्याने उद्योजकांमध्ये मोठी नाराजी आहे. या एमआयडीसीत शॉर्टसर्किट वा अन्य कारणांनी कारखान्यांना आगी लागण्याचे प्रकार होतात. अशाप्रसंगी आग वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी एमआयडीसीत अग्निशामक केंद्राची सोय व्हावी, ही रास्त मागणी एमआयडीसीमधील उद्योग संघटनांची होती. याकरिता अनेक वर्षे पाठपुरावाही करावा लागला. 

या पार्श्‍वभूमीवर गत महिन्यात एमआयडीसीतील पाणी टाकीनजीक तात्पुरते अग्निशामक केंद्र उभारण्यासाठी राजकीयस्तरावर प्रयत्न सुरू झाले. आमदार प्रणिती शिंदे व भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी याकरिता स्वतंत्रपणे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यानुसार एमआयडीसीमध्ये अग्निशामक दलाचे तात्पुरते केंद्र उभारण्याचे निश्‍चित झाले. यानुसार अश्‍निशामक बंब (गाडी) उभारण्यासाठी पत्राशेड उभारण्यात आला. मात्र केंद्रात बंब उभारण्यासाठी खोबा, अग्निशामक दलाच्या जवानांसाठी विश्रांती कक्ष, वीज, शौचालय-बाथरूम, बंबमध्ये पाणी भरण्याची तसेच दूरध्वनीची सोय करणे आवश्‍यक होते. मात्र त्याची पूर्तता होण्याआधीच श्रेय आपल्यालाच मिळण्यासाठी आमदार शिंदे व वल्याळ यांच्यात स्पर्धा लागली. 

या स्पर्धेतून 26 जानेवारी रोजी केंद्राच्या उद्‌घाटनाचे नियोजन आमदार शिंदे यांनी केले. हे कळाल्यावर राजकीय कुरघोडी करण्यासाठी वल्याळ यांनी 25 जानेवारी रोजीच उद्‌घाटनाचा सोहळा तडकाफडकी उरकला. यानंतर दुसऱ्या दिवशी ठरल्यानुसार आमदार शिंदे यांनी उद्‌घाटनाचा स्वतंत्र कार्यकम घेतला. या दोन्हीवेळी अग्निशामक दलाची गाडी उद्‌घाटनस्थळी होती. मात्र उद्‌घाटन सोहळा झाल्यानंतर ही गाडी तेथून गायब झाल्याने एमआयडीसीमधील उद्योग संघटनांचा हिरमोड झाला आहे. 

तात्पुरत्या अग्मिशामक केंद्रासाठी आवश्‍यक सोयी-सुविधा करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांच्या मान्यतेनंतरच तात्पुरते केंद्र सुरू करण्यात येईल. 
- केदार आवटे, 
अधीक्षक, अग्निशामक दल 

संपादन : श्रीनिवास दुध्याल