बससेवेचा निर्णय फसला! पहिल्याच दिवशी 40 हजारांचा खर्च अन्‌ उत्पन्न 'एवढेच'

तात्या लांडगे
Monday, 10 August 2020

ठळक बाबी... 

  • पहिल्या दिवशी 14 मार्गांवर धावल्या 14 बस गाड्या; रिक्षांची वर्दळ वाढली 
  • शहराअंतर्गत 974 किलोमीटर धावल्या बस; प्रतिकिलोमीटर मिळाले दोन रुपयांचे उत्पन्न 
  • इंधनासाठी परिवहन विभागाने राखीव ठेवले 23 लाख रुपये; उत्पन्नापेक्षा इंधनावरील खर्च वाढला 
  • पहिल्या दिवशी इंधनावर साडेएकोणिस हजारांचा खर्च, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 20 हजारांचा खर्च 
  • शासकीय व खासगी कार्यालयात कर्मचारी कमी अन्‌ कोरोनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना 

सोलापूर : शहरातील जनजीवन पूर्ववत झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या परिवहन विभागाने शहरातील विविध मार्गांवर 14 बस सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोमवारी (ता. 10) पहिल्याच दिवशी इंधन आणि चालक-वाहकांच्या पगारीवर 40 हजार 480 रुपयांचा खर्च झाला. दुसरीकडे उत्पन्न मात्र, अवघे दोन हजार रुपये मिळाले. त्यामुळे अडचणीतील परिवहनपुढील अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

परिवहन बस ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालू राहण्यासाठी प्रतिकिलोमीटर 45 रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून प्रतिकिलोमीटर अवघे 18 ते 20 रुपयांचेच उत्पन्न परिवहनला मिळू लागले आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी आवस्था परिवहनची झाली. दरम्यान, 24 मार्चपासून बंद असलेली परिवहन सेवा सुरु करण्याचा निर्णय परिवहन व्यवस्थापकांनी घेतला. मात्र, प्रवाशांचा पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. काही मार्गांवरील बसमध्ये एक-दोन प्रवाशांना घेऊन बस पुढे धावल्याचेही पहायला मिळाले. या पार्श्‍वभूमीवर आता आणखी दोन दिवस हा प्रयत्न सुरु ठेवला जाणार आहे. या काळात प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळाल्यास बससेवा पुढे चालू ठेवली जाणार आहे. अन्यथा पुन्हा बससेवा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

दोन दिवसानंतर होईल अंतिम निर्णय 
शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेने बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पहिल्याच दिवशी उत्पन्नापेक्षा खर्चच मोठा झाला. आता आणखी दोन दिवस प्रवाशांचा प्रतिसाद पाहून निर्णय घेतला जाईल. 
- श्रीशैले लिगाडे, परिवहन व्यवस्थापक, सोलापूर महापालिका 

ठळक बाबी... 

  • पहिल्या दिवशी 14 मार्गांवर धावल्या 14 बस गाड्या; रिक्षांची वर्दळ वाढली 
  • शहराअंतर्गत 974 किलोमीटर धावल्या बस; प्रतिकिलोमीटर मिळाले दोन रुपयांचे उत्पन्न 
  • इंधनासाठी परिवहन विभागाने राखीव ठेवले 23 लाख रुपये; उत्पन्नापेक्षा इंधनावरील खर्च वाढला 
  • पहिल्या दिवशी इंधनावर साडेएकोणिस हजारांचा खर्च, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 20 हजारांचा खर्च 
  • शासकीय व खासगी कार्यालयात कर्मचारी कमी अन्‌ कोरोनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the first day Rs 40480 was spent on fuel and driver-carrier salaries he got only two thousand rupees