खुशखबर ! मोहोळ तालुक्‍यातील अतिवृष्टी बाधितांसाठी पहिल्या टप्प्यातील 21 कोटींची मदत प्राप्त

राजकुमार शहा 
Tuesday, 17 November 2020

ऑक्‍टोबर महिन्यात मोहोळ तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून पहिल्या टप्प्यातील 21 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सध्या याद्या पडताळणीचे काम सुरू आहे, ते होताच येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. 

मोहोळ (सोलापूर) : ऑक्‍टोबर महिन्यात मोहोळ तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून पहिल्या टप्प्यातील 21 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सध्या याद्या पडताळणीचे काम सुरू आहे, ते होताच येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. 

14 व 15 ऑक्‍टोबर रोजी मोहोळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्या, ओढे, बंधारे यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. कुठलीही पूर्वमाहिती नसताना अचानक आलेल्या या संकटामुळे दोन दिवसांतच शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. अनेक दुभती जनावरे वाहून गेली. ज्यांना दावणीवरून सुटता आले नाही अशा जनावरांचा जागेवरच मृत्यू झाला. तर घरात पाणी शिरल्याने अनेक घरे जमीनदोस्त झाली. प्रापंचिक साहित्यापैकी काहीही वाचवता आले नाही. 

दरम्यान, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी विविध विभागांतील 175 कर्मचाऱ्यांची नेमणूक करून बाधितांचे तातडीने पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. सुमारे 45 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात जिराईत, बागायत मिळून 23 हजार हेक्‍टर तर विविध फळबागांचे 8 हजार हेक्‍टरवरील नुकसान झाले आहे. बागायतीमध्ये ऊस, मका, सोयाबीन आदींसह अन्य पिकांचा समावेश आहे. फळबागांमध्ये डाळिंब, सीताफळ, द्राक्ष आदींचा समावेश आहे. 

ज्या शेतकऱ्यांच्या घरांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यांना 63 लाख रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर एक-दोन दिवसांत वर्ग केले जाणार आहेत. तहसीलदार बनसोडे यांनी तालुक्‍यात झालेल्या नुकसानीसाठी 45 कोटींचा मदतीचा आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 21 कोटी प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. 

तालुक्‍यातील अशी आहे वस्तुस्थिती 

  • एकूण बाधित शेतकरी : 45 हजार 
  • जिरायत बागायत एकूण नुकसान : 23 हजार हेक्‍टर 
  • फळबागांचे एकूण नुकसान : 8 हजार हेक्‍टर 
  • नुकसानीची एकूण मागणी : 45 कोटी 
  • पहिल्या टप्प्यातील प्राप्त मदत : 21 कोटी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first phase of relief was received for the flood victims in Mohol taluka