पांगरी येथे कोव्हिड सेंटरचा प्रारंभ; जिल्ह्यात प्रथमच ग्रामीण भागाला मिळाली सुविधा 

बाबासाहेब शिंदे 
Monday, 26 October 2020

पांगरी (ता. बार्शी) येथील ग्रामीण रुग्णालयात पंचक्रोशीतील रुग्णांसाठी कोव्हिड सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचे उद्‌घाटन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, ग्राहक समितीचे तालुकाध्यक्ष विष्णू पवार, डॉ. रवींद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. 

पांगरी (सोलापूर) : पांगरी (ता. बार्शी) येथील ग्रामीण रुग्णालयात पंचक्रोशीतील रुग्णांसाठी कोव्हिड सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचे उद्‌घाटन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, ग्राहक समितीचे तालुकाध्यक्ष विष्णू पवार, डॉ. रवींद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. 

जिल्ह्यात प्रथमच ग्रामीण भागात कोरोनाबाधित गरोदर मातांसाठी दहा बेड व कोव्हिड रुग्णांसाठी दहा बेडची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुहास देशमुख होते. रविवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर कोव्हिड सेंटरच्या उद्‌घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल, सरपंच युन्नूस बागवान, डॉ. रवींद्र माळी, डॉ. आरिफ शेख, विशाल गरड, विलास जाधव, कमलाकर पाटील, दिलदार तांबोळी, विजय गरड, चंद्रकांत गोडसे, इशाद शेख, तात्या बोधे, दशरथ उकिरडे, सतीश जाधव, विष्णू पवार आदी उपस्थित होते. 

या वेळी रेखा राऊत म्हणाल्या, पांगरी येथे कोव्हिड सेंटर आणि 20 ऑक्‍सिजन बेडची सुविधा झाल्याने रुग्णांना इतर ठिकाणच्या रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. कोरोनावरील टेस्टही या ठिकाणी करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी घाबरून न जाता कोरोनाची लक्षणे जाणवत असतील तर टेस्ट करवून घ्याव्यात. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन विविध सुविधा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

सुधीर तोरडमल म्हणाले, हा आजचा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. कोव्हिड सेंटर चालू करण्यासाठी झालेल्या पाठपुराव्यामुळे पांगरी पंचक्रोशीतील जनतेला त्याचा फायदा होणार आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असून "माझे कुटुंब - माझी जबाबदारी' पार पाडत असताना स्वतःची काळजी घेत मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स पाळले पाहिजे. मास्क न वापरल्यास शंभर रुपये दंड केला जात होता; मात्र आता 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी जनतेने पाळल्या पाहिजेत. 

विशाल गरड म्हणाले, ऑक्‍सिजन बेड रुग्णांसाठी अमृत असून, रुग्णांसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. कोव्हिड सेंटरमुळे रुग्णांचे वाचलेले जीव खऱ्या अर्थाने योगदान ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time in the district a covid center was started at Pangri