उजनी जलाशयात गुदमरतोय माशांचा श्‍वास ! प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी 

राजाराम माने 
Wednesday, 13 January 2021

उजनी जलाशयाचे पाणी वरचेवर प्रदूषित होत आहे. त्यातच उजनी बॅकवॉटर परिसरातील करमाळा तालुक्‍यातील सोगाव परिसरात जलाशयातील पाण्याला आता काळसर रंग आल्याने जलाशयाच्या कडेला अडचणीच्या जागेमध्ये अधिवासात लपलेले मासे मरण पावत असल्याचे दिसून येत आहे. तर पाण्यावरही मृत मासे तरंगताना दिसत आहेत. पाणी प्रदूषणामुळे माशांचा श्वास गुदमरतोय, हे यावरून स्पष्ट होत आहे. 

केत्तूर (सोलापूर) : उजनी जलाशयाचे पाणी वरचेवर प्रदूषित होत आहे. त्यातच उजनी बॅकवॉटर परिसरातील करमाळा तालुक्‍यातील सोगाव परिसरात जलाशयातील पाण्याला आता काळसर रंग आल्याने जलाशयाच्या कडेला अडचणीच्या जागेमध्ये अधिवासात लपलेले मासे मरण पावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून या ठिकाणी जाळीद्वारे मासेमारी करणारे पदमेश नगरे यांच्या जाळ्यात मृत मासे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. तर पाण्यावरही मृत मासे तरंगताना दिसत आहेत. पाणी प्रदूषणामुळे उजनी जलाशयातील माशांचा श्वास गुदमरतोय, हे यावरून स्पष्ट होत आहे. 

सध्या उजनी जलाशय अथांग भरलेले असून, जानेवारी महिन्यातच पाणीसाठा 104 टक्के एवढा आहे. परंतु, जलाशयात मासे सापडण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. सध्या परिसरातील पाण्याला आलेल्या काळसरपणामुळे पाण्यातील माशांबरोबरच इतर जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. 

एकीकडे बर्ड फ्लूमुळे कोंबड्या व अंड्यांवर संक्रांत आली असतानाच, आता उजनी जलाशयातील प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडू लागल्याने मांसाहार खवय्यांपुढे मात्र संकट उभे राहिले आहे. 

पावसाळ्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग झाला नसल्याने व पाणी स्थिरावलेल्या स्थितीत आहे. परिणामी पाण्यातील झालेल्या प्राणवायूच्या कमतरतेमुळे मासे मृत्युमुखी पडत असतील. शिवाय, थांबून राहिलेल्या पाण्यातील प्रदूषण घटकांचे प्रमाणही वाढल्याने मत्स्य जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. पुढील काही दिवसांत धरणातून पाणी सोडल्यावर मासे मोकळा श्वास घेतील. 
- डॉ. अरविंद कुंभार, 
प्राणीशास्त्र अभ्यासक 

मासेमारी करणारे स्थानिक मच्छीमार व परप्रांतीय मच्छीमार आपल्या लहान जाळीच्या सहाय्याने मासेमारी करतात. त्यामुळे विविध जातींचे छोटे छोटे मासे नष्ट होत आहेत. लहान मासेमारीवर त्वरित बंदी घालण्यात यावी. 
- कल्याणराव साळुंके, 
पक्षी व पर्यावरणप्रेमी,कुंभेज 

वरचेवर उजनी जलाशयातील पाण्याच्या प्रदूषणात वाढच होत आहे. त्यामुळे माशांबरोबरच इतर जलचरांचाही श्वास गुदमरतो आहे. प्रशासनाने उजनी प्रदूषणविरोधात मोहीम आखणे व राबविणे गरजेचे आहे. 
- राहुल इरावडे, 
केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish in Ujani reservoir are dying due to pollution