
रतनचंद शहा सहकारी बॅंक लिमिटेड, मंगळवेढा या बॅंकेच्या टेंभुर्णी येथील शाखेतील हातावरील शिल्लक रक्कम व इतर दोन बॅंकांमधील बॅंकेच्या खात्यामधील रक्कम असा एकूण 5 कोटी 57 लाख दोन हजार 822 रुपयांचा अपहार तत्कालीन शाखाधिकारी व कॅशिअर यांनी संगनमताने केल्याची फिर्याद बॅंकेचे सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिली आहे.
टेंभुर्णी (सोलापूर) : रतनचंद शहा सहकारी बॅंक लिमिटेड, मंगळवेढा या बॅंकेच्या टेंभुर्णी येथील शाखेतील हातावरील शिल्लक रक्कम व इतर दोन बॅंकांमधील बॅंकेच्या खात्यामधील रक्कम असा एकूण 5 कोटी 57 लाख दोन हजार 822 रुपयांचा अपहार तत्कालीन शाखाधिकारी व कॅशिअर यांनी संगनमताने केल्याची फिर्याद रतनचंद शहा सहकारी बॅंकेचे सरव्यवस्थापक अरविंद हिरालाल नाझरकर (वय 67, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे टेंभुर्णी शहर व परिसरातील बॅंकेचे खातेदार व ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली असून, बॅंकेच्या टेंभुर्णी शाखेतील ठेवी काढण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात तत्कालीन शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू (रा. सांगोला महाविद्यालय शेजारी, कडलास रोड, सांगोला) व तत्कालीन कॅशिअर अशोक भास्कर माळी (रा. शुक्रवार पेठ, टेंभुर्णी, ता.माढा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या टेंभुर्णी येथील शाखेत हरिदास राजगुरू हे 11नोव्हेंबर 2014 पासून शाखाधिकारी तर कॅशिअर म्हणून अशोक माळी हे कार्यरत होते. या बॅंकेने धनराज नोगजा अँड असोसिएट्स, सोलापूर यांच्याकडे लेखा परीक्षणाचे काम दिले होते. त्यांनी केलेल्या लेखा परीक्षणामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये विसंगती झाल्याचे निदर्शनास आले. यासंबंधीचा लेखापरीक्षण अहवाल बॅंकेकडे सादर केला. रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने लेखापरीक्षण अहवालावर बैठकीत विचारविनिमय करून दयासागर सिद्धेश्वर देशमाने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. धनराज नोगजा अँड असोसिएट्सचा लेखापरीक्षण अहवाल व दयासागर देशमाने यांनी केलेल्या चौकशीमध्ये रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या टेंभुर्णी शाखेमध्ये हातावरील शिल्लक असलेल्या रकमेमध्ये 1 कोटी 14 लाख 87 हजार 822 रुपये तसेच 2016 ते 2020 या कालावधीत शाखेच्या बॅंक ऑफ इंडिया, शाखा टेंभुर्णी या बॅंकेच्या खात्यामध्ये 1 कोटी 92 लाख 25 हजार रुपये त्याचबरोबर बॅंकेच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, शाखा टेंभुर्णी या बॅंकेतील खात्यामध्ये 2 कोटी 49 लाख 90 हजार रुपये अशी एकूण 5 कोटी 57 लाख 2 हजार 822 रुपयांची तफावत आढळून आली. त्यामुळे बॅंकेचे टेंभुर्णी येथील शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी हरिदास राजगुरू व तत्कालिन कॅशिअर अशोक माळी या दोघांनी संगनमताने या रकमेचा अपहार केल्याचे बॅंकेचे सरव्यवस्थापक अरविंद हिरालाल नाझरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे तपास करीत आहेत.
रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या टेंभुर्णी येथील शाखेत टेंभुर्णी शहर व परिसरातील, व्यापारी व नागरिकांच्या लाखो रुपयांच्या ठेवी आहेत. रतनचंद शहा सहकारी बॅंकेच्या टेंभुर्णी येथील शाखेत अपहार झाल्याचे कळताच टेंभुर्णी शहर व परिसरातील खातेदार व ठेवीदारांची गेल्या दोन दिवसांपासून येथील शाखेमध्ये पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. बॅंकेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची मदत बॅंकेने घेतली आहे. बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी स्वतः टेंभुर्णी येथील शाखेत उपस्थित राहून बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, खातेदार व ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. बॅंकेतील त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत, असे सांगितले.
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्याचा तपास सुरू असून, दोन पोलिस पथके तयार केली आहेत. यातील आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करीत आहोत.
- राजकुमार केंद्रे,
पोलिस निरीक्षक, टेंभुर्णी
संपादन : श्रीनिवास दुध्याल