भांडण मिटविणाऱ्यालाच पाचजणांनी बदडले ! 

तात्या लांडगे 
Thursday, 29 October 2020

जवाहरनगर रोडवरील प्रगती चौक परिसरातील सागर पान शॉपमागे सार्वजनिक रोडलगत रोहित झालटे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य थांबले होते. त्या वेळी संतोष इंजामुरी याने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गाडी नीट चालव, म्हटल्यानंतर इंजामुरीने "तू का गल्लीचा मालक आहे का' म्हणत मारहाण केली. दोघांनाही समजावून सांगून भांडण मिटविले. काही वेळाने इंजामुरीने "तू भांडण मिटविले, तुला खूप मस्ती आली का' म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. 

सोलापूर : जवाहरनगर रोडवरील प्रगती चौक परिसरातील सागर पान शॉपमागे सार्वजनिक रोडलगत रोहित झालटे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य थांबले होते. त्या वेळी संतोष इंजामुरी याने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गाडी नीट चालव, म्हटल्यानंतर इंजामुरीने "तू का गल्लीचा मालक आहे का' म्हणत मारहाण केली. दोघांनाही समजावून सांगून भांडण मिटविले. काही वेळाने इंजामुरीने "तू भांडण मिटविले, तुला खूप मस्ती आली का' म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याच्यासोबत आलेल्या पाच अनोळखी तरुणांनीही मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलालाही त्यांनी मारहाण केल्याची फिर्याद राजू राजमोगली बेत (रा. जवाहर नगर, प्रगती चौक) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. 

एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक 
पल्स ऑक्‍सिमीटर व एक्‍झाम ग्लोजचे फोटो संजय श्‍यामलाल सोमाणी (रा. मंगल रेसिडेन्सी, जुळे सोलापूर) यांच्या मोबाईलवर पाठवून कमी दरात मिळतील, असे समोरील व्यक्‍तीने सांगितले. त्यानंतर ऑर्डर पाठवून देण्यासाठी ऍडव्हान्स पेमेंट करावे लागेल, असेही समोरील व्यक्‍तीने सांगितले. त्यानंतर सोमाणी यांनी वेळोवेळी एक लाख 20 हजार 809 रुपये ऑनलाइन पाठविले. तरीही त्याने वस्तू पाठविल्या नाहीत. त्यानंतर मोहित अग्रवाल व जीवन या नावे मोबाईल क्रमांक असलेल्या व्यक्‍तीने 20 हजार रुपये परत पाठविले. उर्वरित रक्‍कम परत न पाठविता माझी फसवणूक केल्याची फिर्याद श्री. सोमाणी यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. मस्के करीत आहेत. 

मागील भांडणातून चाकूने हल्ला 
मजरेवाडी परिसरातील राघवेंद्र नगर येथील नवीनकुमार राजू दुपारगुडे हा मंगळवारी (ता. 27) जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूल परिसरात आला होता. त्या वेळी तन्वीर भाईजान याने मागील भांडणाच्या रागातून लोखंडी चाकूने चेहऱ्यावर हल्ला केला. त्यात दुपारगुडे याच्या चेहऱ्याला खरचटले असून तो उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

गाडीचा ब्रेक फेल होऊन अपघात 
माणकेश्‍वर (जि. परभणी) येथील रामप्रसाद दामोदर गडदे हे पुण्यावरून हैदराबादकडे जात असताना मार्केट यार्डसमोरील ब्रिजजवळ त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल झाला. त्यावेळी रस्त्यालगत थांबलेल्या वाहनाला मागून धडक दिली. या अपघातात गडदे यांच्या पायाला, हाताला जखम झाली. तर त्यांचा मदतनीस विकी सरवदे यांनाही मुक्‍कामार लागला आहे. दोघांनाही उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असून, दोघेही शुद्धीवर असल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five people beat to the person who had settled the dispute