सोलापुरातील पाच, बार्शी, मंगवळेढ्यातील प्रत्येकी एका  रुग्णालयातून मिळणार महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ 

प्रमोद बोडके
Wednesday, 10 June 2020

प्रत्येक तालुक्‍यात दोन अंगीकृत रुग्णालये 
लाभार्थ्यांना मुबलक व सहजपणे आरोग्यसेवांचा लाभ मिळण्यासाठी अंगीकृत रूग्णालयांची संख्या 492 वरून एक हजार पर्यंत करण्यात येणार आहे. अंगीकृत रूग्णालयाचे विभाजन मल्टिस्पेशालिटी रुग्णालये आणि सिंगल स्पेशालिटी रुग्णालये अशा दोनच श्रेणी देण्यात येणार आहे. सीमा भागातील लाभार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी शेजारील राज्यांमधील रुग्णालयांचेही अंगीकरण करण्यात येणार आहे. राज्यामध्ये तालुक्‍याच्या ठिकाणीही सम प्रमाणात आरोग्य सेवांची उपलब्धता होण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यांमध्ये किमान दोन रुग्णालये अंगीकृत करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. ढेले यांनी दिली. 

सोलापूर : राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा प्रारंभ केला आहे. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी या आरोग्य योजनेतून 33 रुग्णालयातून सेवा मिळत होती. कोविड-19 च्या साथरोगामुळे आणि इतर आजारांवरील उपचारासाठी आता आणखी सात रुग्णालयांमधून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटल, अश्विनी सहकारी रुग्णालय, मोनार्क हॉस्पिटल, मार्कंडेय सहकारी रुग्णालय, धनराज गिरजी हॉस्पिटल (सोलापूर), मंगळवेढ्यातील महिला हॉस्पिटल, बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलचा यात समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले दिली. 

सध्या योजनेमध्ये पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबे, 14 अवर्षणग्रस्त जिल्ह्यामधील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे, नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांची कुटुंबे. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला, अनाथ आश्रमातील मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या निकषानुसार पत्रकार आणि त्यांची कुटुंबे यांना लाभ दिला जात आहे.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी 996 आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी 996 उपचारांसह 213 अधिकचे असे एकूण 1209 आजारांवर उपचार समाविष्ट आहेत. सध्याच्या 971 पद्धतीपैकी 116 पद्धती वापर कमी असल्यामुळे वगळण्यात आल्या असून 141 नवीन पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. काही पद्धतीचे दर वाढले तर काहींचे कमीही केले आहेत. सर्व लाभार्थ्यांना गुडघे व खुब्याच्या सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा लाभ मिळणार आहे. लहान बालकांमधील कर्करोग व मानसिक आजारांवरील उपचारही होणार असल्याचे डॉ. ढेले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five from Solapur, one each from Barshi and Mangavale Benefit of Mahatma Jotiba Phule Health Scheme from the hospital