सावधान! पाच दिवसांत वाढले पाच हजार रुग्ण; 'या' 11 महापालिकांभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा

Five thousand corona patients increased in five days
Five thousand corona patients increased in five days

सोलापूर : लॉकडाऊनची मुदत वाढवूनही राज्याभोवती पडलेला कोरोना विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे. 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात 10‌ हजार 498 रुग्ण होते. पाच दिवसांत (5 मेपर्यंत) पाच हजार 42 रुग्णांची भर पडली आहे. लॉकडाऊनची मुदत आता 12 दिवस राहिली असताना, रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या चिंताजनक मानली जात आहे.
राज्यात 10 मार्च रोजी पाच तर 11 मार्च रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अवघी सात होती. पहिल्या लॉकडाऊनपूर्वी (22 मार्चपर्यंत) राज्यातील रुग्णांची संख्या 74 वर पोहोचली होती. कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने 14 एप्रिल पर्यंत पहिला लॉकडाऊन जाहीर केला. पहिला लॉकडाऊन संपला तेव्हा राज्यातील रुग्णांची संख्या दोन हजार 684 इतकी होती. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने लॉकडाऊनची मुदत पुन्हा 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, 30 एप्रिलपर्यंत राज्यात 10 हजार 498 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, 1 ते 5 मेपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये तब्बल पाच हजार 42 रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंतच्या रुग्ण वाढीत ही सर्वाधिक वाढ मानली जात आहे.

11 महापालिकांच्या परिसरात13 हजार 949 रुग्ण
गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नसून वाशिम, बीड, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर चंद्रपूरमध्ये चार, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी तीन, परभणीत दोन आणि जालन्यात आठ तर रत्नागिरीत दहा रुग्ण झाले आहेत. या 13 जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत एकूण 37 रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे मात्र, मुंबई महापालिका (2,133), नवी मुंबई (222), कल्याण-डोंबिवली (48), मीरा-भाईंदर (47), मालेगाव (160), पुणे (660), सोलापूर (44), औरंगाबाद (178), नागपूर (46), पनवेल (59) व पिंपरी चिंचवड (51) या 11 महापालिकांच्या परिसरामध्ये मागील पाच दिवसांत (5 मेपर्यंत) तब्बल तीन हजार 648 नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 15 हजार 540 झाली असून वरील 11 महापालिकांच्या परिसरातच तब्बल 13 हजार 949 रुग्ण आढळले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात अवघे एक हजार 591 रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आत्तापर्यंत दोन हजार 819 रुग्ण बरे झाले असून 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापुरातील पाच रुग्ण करत होते सार्वजनिक शौचालयाचा वापर
राज्यातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महापालिका परिसरातीलच असल्याचे समोर आले आहे. सोलापुरात 5 मेपर्यंत सापडलेल्या 145 रुग्णांपैकी पाच रुग्ण सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत होते, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले यांनी दिली. त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली असता, त्यांच्या घराचा परिसर सोडतात ते कुठेही गेले नसल्याचेही सांगण्यात आले. मग त्यांना कोरोनाच्या विषाणूची बाधा झालीच कुठून याचे ठोस कारण समोर आलेले नाही. दरम्यान, महापालिकेने उशिरा का होईना, केंद्रीय आरोग्य पथकाच्या आदेशानंतर सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com