अथांग भरलेल्या उजनी जलाशयाला प्रतीक्षा विदेशी फ्लेमिंगो पक्ष्याची ! 

राजाराम माने 
Tuesday, 1 December 2020

पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या व अथांग भरलेल्या उजनी जलाशयावर देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट यावर्षी कमी प्रमाणात ऐकावयास मिळत आहे. पक्षी निरीक्षक, अभ्यासक तसेच पक्षीमित्र आणि उजनी परिसरातील ग्रामस्थ मात्र आकर्षक फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

केत्तूर (सोलापूर) : पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक व पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या व अथांग भरलेल्या उजनी जलाशयावर देशी-विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट यावर्षी कमी प्रमाणात ऐकावयास मिळत आहे. पक्षी निरीक्षक, अभ्यासक तसेच पक्षीमित्र आणि उजनी परिसरातील ग्रामस्थ मात्र आकर्षक फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

यावर्षी नोव्हेंबर संपला तरी उजनीकडे विदेशी पक्ष्यांनी पाठ फिरवली असल्याने उजनी जलाशय परिसर मात्र देशी-विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय सुना-सुना वाटू लागला आहे. फ्लेमिंगो पक्ष्यामुळे उजनी जलाशयाचे नाव जगभर पसरलेले आहे. मध्यंतरी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पळसदेव (ता. इंदापूर) परिसरात चार-पाच फ्लेमिंगो दिसल्याची माहिती पर्यावरणप्रेमी प्रवीण नगरे यांनी दिली होती. त्यानंतर मात्र ते दिसले नाहीत. 

वेडा राघू, कोकिळा, मोर, घार, पोपट, रंगीत करकोचा (चित्रबलाक), पाणडुबी, पाणकोंबडी, हळदीकुंकू बदक, गायबगळ्या यांसह छोटे व मोठे बगळे, खाटीक, कोतवाल आदी देशी पक्षी उजनी जलाशयावर बहुसंख्येने वावरताना दिसत आहेत; मात्र नेहमी उजनी जलाशयावर हजेरी लावणाऱ्या फ्लेमिंगोसह रोजी पॅस्टर (भोरड्या), छोटे सीगल, ऍशियन ड्रोंगो, ग्रीन व पर्पल शांक आदी स्थलांतर करून येणाऱ्या परदेशी पक्ष्यांनी मात्र अद्याप तरी पाठच फिरविली आहे. 

यंदा पाऊस जास्त झाल्याने, "पाणी जास्त व दलदल कमी' यामुळे खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार नाही. कदाचित यामुळे जानेवारीत पाणी कमी झाल्यावर जास्त पक्ष्यांचा वावर आढळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

अवकाळी पाऊस, निवारा, चक्रीवादळ तसेच मध्यंतरी आठवडाभर सुटलेले कडाक्‍याचे वादळ व बदललेल्या वातावरणाचा फटका देशी-विदेशी पक्ष्यांना बसला आहे. वातावरणातील बदलामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे ऑक्‍टोबर महिन्यात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचे आगमन मात्र त्यामुळे लांबणीवर पडले आहे. 
- डॉ. प्रा.अरविंद कुंभार,
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक 

या वर्षी जलाशयात सर्वत्र पाणीच पाणी असल्याने पाणथळ जागा अद्याप रिकाम्याच झाल्या नाहीत. परिणामी पक्ष्यांना चराऊ भाग व विश्रांतीसाठी योग्य जागा उपलब्ध होत नसल्याचे कारणही उजनी जलाशयावर पक्षी विलंब येतील असे वाटते. 
- कल्याणराव साळुंके,
पक्षीप्रेमी, कुंभेज 

लांबलेला परतीचा पाऊस व हवामानात वारंवार होणाऱ्या बदलाचा विचार करता, थंडीचा कडाका वाढताच वर्षअखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबर महिन्यात फ्लेमिंगोसह इतर विदेशी पक्ष्यांचे निश्‍चितच आगमन होईल. 
- राहुल इरावडे,
पक्षीप्रेमी, केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flamingos have not yet arrived in the Ujani dam area