दुर्मिळ राज्य पक्षी "हरियाल'चा थवा घालतोय सोलापूर जिल्ह्यात घिरट्या ! 

Hariyal Bird
Hariyal Bird

केत्तूर (सोलापूर) : राज्याचा मानबिंदू असलेला व महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून ओळख असलेला "हरियाल' अर्थात हिरव्या कबुतरांचा एक थवा करमाळा तालुक्‍यातील जेऊर येथे पक्षी निरीक्षकांना आढळून आला आहे. जेऊर येथील बाजार तळाजवळील पिंपळाच्या झाडावर या पक्ष्यांनी आश्रय घेतला आहे. विशेष म्हणजे एक- दोन नव्हे तर दहा-बारा पक्षी आढळून आल्याची माहिती स्थानिक पक्षी अभ्यासक कल्याणराव साळुंके (कुंभेज) यांनी दिली. 

या पक्ष्याला हरितालिका, हरोळी, पिवळ्या पायाचा होला या नावानेही ओळखतात. इंग्रजीत त्याला ग्रीन पिजन असे म्हणतात. हिरवा कबूतर हा विविधतेने नटलेला पक्षी असून त्याचा आकार नेहमीच्या कबूतरांपेक्षा थोडे लहान आहे. हा पक्षी विदर्भातील शुष्क पानगळीच्या जंगलात व सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नेहमी आढळून येतो. सोलापूर जिल्ह्यात हा पक्षी आढळणे तसे दुर्मिळच; परंतु दरवर्षी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात कुठे ना कुठे हे पक्षी लहान- मोठ्या थव्यांमध्ये आढळतात. दिवसभर खाद्यासाठी हिंडून झाल्यावर सायंकाळी हे पक्षी समूहाने वड किंवा पिंपळाच्या झाडावर मुक्काम करतात. 

हिरव्या- पिवळ्या रंगांचे पंख, नारंगी गळापट्टी, खांद्यावर विटकरी छप्पा, उठून दिसणारे पिवळे पाय या वैशिष्ट्यांमुळे हा पक्षी ओळखता येतो. हे पक्षी मार्च ते जून दरम्यान म्हणजे पावसाळ्यात घनदाट जंगलात, उंच झाडांवर कबुतराप्रमाणे घरटी साकारून नव्या पिढीला जन्म घालतात. ऐन पावसाळ्यात त्यांच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी पुरेसे अन्न उपलब्ध होत नसल्यामुळे हे पक्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील पठारी प्रदेशांत काही दिवसांसाठी स्थलांतर करून येतात व पावसाळ्याअंती परत आपल्या मूळ स्थानी परततात. 

यापूर्वी जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्‍याच्या चपळगाव, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्‍यातील अकलूज या ठिकाणी हे पक्षी आढळून आले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात हे पक्षी पिंपळाच्या झाडावर सकाळच्या वेळी ऊन खात झाडाच्या टोकावर बसल्याचे चित्र अतिशय विलोभनीय वाटते. बऱ्याच वेळा वड-पिंपळाच्या पानांचा रंग आणि या पक्ष्यांच्या पंखांचा रंग मिळताजुळता असल्यामुळे हे पक्षी ओळखणे कठीण जाते. जिल्ह्यात अशा दुर्मिळ असलेल्या हरियाल पक्ष्याचा वावर म्हणजे निसर्गप्रेमींसाठी औत्सुक्‍याची बाब आहे. 

सोलापूरच्या पक्षी वैभवात भर 
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाने राज्य पक्षी म्हणून गौरविलेला हरियाल पक्षी खाद्याच्या शोधात सोलापूर जिल्ह्यात थव्याने आले आहेत. जमिनीवर बसण्यास पसंत नसलेल्या या विशिष्ट पक्ष्यांच्या आगमनामुळे सोलापूरच्या पक्षी वैभवात भर पडली आहे. 

हरियालच्या ठिकाणांची जोपासना केल्यास वाढेल संख्या 
कुंभेज (ता. करमाळा) येथील पक्षी निरीक्षक कल्याणराव साळुंखे म्हणाले, हरियाल पक्षी आपली मूळची वास्तव्याची ठिकाणे सोडून आपल्याकडे जागा व खाद्य शोधताना दिसतात. या पक्ष्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची जोपासना करणे आवश्‍यक आहे. त्यांना प्रिय असलेल्या वड-पिंपळ वृक्षांची लागवड करून जोपासना केली पाहिजे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com