सोलापुरातील पाच रासायनिक ताडी विक्रेत्यांवर अन्न प्रशासनाची कारवाई 

प्रमोद बोडके
Thursday, 19 November 2020

पाचही ठिकाणच्या या कारवाईमध्ये 18 हजार 365 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या रासायनिक ताडी विक्रेत्यांकडील ताडीचे नमुने तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात रासायनिक ताडीची विक्री होत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज अन्न प्रशासन विभागाच्यावतीने पाच ठिकाणी छापे टाकण्यात आल्या. या ठिकाणाहून रासायनिक पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. येथील ताडीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तसेच रासाययिक ताडी विक्रीची ही पाचही दुकाने सील करण्यात आली आहेत. 

सोलापुरातील आकाशवाणी रोडवरील नीलमनगर येथील श्रीमती सत्यभामा सुभाष कोकोंडा यांच्याकडून 298 लिटर ताडी व 3 किलो क्‍लोरल हायड्रेडचा साठा जप्त करण्यात आला आहे. रविवार पेठेतील जय हॉस्पिटलच्या मागे असलेल्या कौशल्य मारुती गुजराती यांच्याकडून 283 लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. विडी घरकुल येथील गोल्डन ड्रिंक्‍स्‌चे मालक रामलु कनकाय्या भंडारी यांच्याकडून आठ किलो पांढरी रासायनिक पावडर जप्त करण्यात आली आहे.

जोडभावी पेठेतील शिंदी खाना येथील विठ्ठल भंडारी यांच्याकडून तयार ताडीचे 567 पाऊच (283 लिटर ताडी) जप्त करण्यात आले आहेत. रविवार पेठेतील वडार गल्ली येथील तिमक्का मंजुळे यांच्या घरातून सर्वेक्षण ताडी नमुना घेण्यात आला आहे. ही कारवाई अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न. त. मुजावर, एम. एम. लवटे, पी. एस. कुचेकर, यो. रो. देशमुख, यु. एस. भुसे, सांगली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, चन्नवीर स्वामी व सातारा कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, अनिल पवार यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food administration action against five chemical toddy sellers in Solapur