खाद्य पदार्थांच्या दुकानात आता "नो मास्क, नो एंट्री' 

प्रमोद बोडके
Wednesday, 7 October 2020

शेटफळमधील साबळे वस्ती येथील श्‍याम दूध संकलन केंद्र चालकाच्या विरोधात दूध भेसळ या संदर्भात खटलाही दाखल करण्यात आला आहे. या खटल्या शिवाय हा दोन लाख 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तडजोडीतून ही रक्कम निश्‍चित झाली असून ही रक्कम भरण्याचे त्यांनी मान्य केले आहे. भेसळी संदर्भातील खटला न्यायालयात चालविला जाणार आहे. 
- प्रदीप राऊत, सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन 

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेतून अन्न प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध आस्थापनांमध्ये "नो मास्क, नो एन्ट्री'ची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार असून याबाबत सर्व आस्थापनांना कळविण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. 

अन्न प्रशासनाने केली 43 मिठाई दुकानांची तपासणी 
मिठाई दुकान, स्वीट होममध्ये तयार होणाऱ्या पदार्थाची मुदत संपण्याची तारीख प्रदर्शित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या नियमाची अंमलबजावणी 1 ऑक्‍टोंबरपासून सुरु झाली आहे. या नियमाची अंमलबजावणी होते की नाही? हे पाहण्यासाठी अन्न प्रशासनाच्यावतीने 43 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. विजापूर रोडवरील स्वामी समर्थ स्वीट मार्टमध्ये या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न प्रशासनाने या दुकानदारास सात हजार रुपयांचा दंड आकारल्याची माहिती अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. सहाय्यक आयुक्त राऊत म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार 1 ऑक्‍टोबरपासून सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईची मुदतबाह्य तारीख प्रसिद्ध करणे आवश्‍यक आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न प्रशासन विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. या नियमाचे पालन होत नसल्याबाबत या तक्रारी अन्न प्रशासन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांना याबाबत तक्रारी असल्यास त्यांनी अन्न प्रशासन विभागाची संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक प्रशासन आयुक्त प्रदीप राऊत यांनी केले आहे. 

दूध संकलन केंद्र चालकाला सव्वादोन लाखांचा दंड 
दुधामध्ये भेसळ केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्‍यातील शेटफळ येथील साबळे वस्ती येथील श्‍याम दूध संकलन केंद्राचे शहाजी गोपाल साबळे यांना दोन लाख 25 हजार रुपयांचा दंड अन्न प्रशासनाने केला आहे. अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी हा दंड आकारला आहे. या दूध संकलन केंद्रावर डिसेंबर 2019 मध्ये अचानक तपासणी करण्यात आली होती. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी कॉटन सीड ऑईल, लॅक्‍टोज पावडर व व्हे परमिएट पावडर आढळून आली होती. परमीएट पावडर, लॅक्‍टोज पावडर व कॉटन सीड ऑईल मिसळल्या प्रकरणी प्रत्येकी 75 हजार रुपयांचा दंड तडजोडीतून आकारण्यात आला आहे. ही रक्कम साबळे यांनी तीस दिवसांच्या आत जमा करावी अशी सूचनाही अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राऊत यांनी या आदेशात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food shop now has "No Mask, No Entry"