50 वर्षांचे राजकीय हाडवैर विसरून कासेगावचे देशमुख बंधू एकत्र ! ग्रामपंचायतीमध्ये नवी समीकरणे

भारत नागणे 
Wednesday, 6 January 2021

पांडुरंग साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव देशमुख, विठ्ठल कारखान्याचे संचालक व पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख आणि पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख हे तिन्ही प्रमुख नेते यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने 50 वर्षांनंतर प्रथमच एकत्र आले आहेत. 

पंढरपूर (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाऊबंदकी आणि नात्यागोत्याचे राजकारण नेहमीच चर्चेत असते. गावातील राजकीय प्रतिष्ठेबरोबरच मानपान मिळावा यासाठी आजही घराघरांत राजकीय वैर पाहायला मिळते. परंतु, या खोट्या प्रतिष्ठेला फाटा देत विकासाच्या मुद्द्यावर कासेगाव (ता. पंढरपूर) येथील तीन देशमुख बंधूंनी एकत्रित येत परस्परातील गेल्या तीन पिढ्यांचे राजकीय वैर संपुष्ठात आणत एकीचे दर्शन घडवले आहे. 

पांडुरंग साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव देशमुख, विठ्ठल कारखान्याचे संचालक व पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख आणि पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख हे तिन्ही प्रमुख नेते यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने 50 वर्षांनंतर प्रथमच एकत्र आले आहेत. (कै.) बाळासाहेब देशमुख, (कै.) अण्णासाहेब देशमुख विरुद्ध (कै.) दौलतराव देशमुख व बाबासाहेब देशमुख यांचे गावात राजकीय गट सक्रिय होते. त्यांच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख विरुद्ध विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह देशमुख यांनीही एकमेकांच्या विरोधात अनेक निवडणुका लढवल्या आहेत. 

गेल्या पंधरा वर्षांपासून येथील ग्रामपंचायतीवर विजयसिंह व प्रशांत देशमुख यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. त्यानंतर आता गेल्या 50 वर्षांचे राजकीय वैर विसरून वसंतराव देशमुख आणि विजयसिंह देशमुख गावच्या विकासासाठी एकत्रित आले आहेत. त्यामुळे येथील भाऊबंदकीचा वाद मिटला आहे. 

निवडणुकीच्या निमित्ताने देशमुख बंधू एकत्रित आल्याने गावातील इतर लोकांनी मात्र एकत्रित येत देशमुख बंधू विरोधात स्वतंत्र पॅनेल तयार केले आहे. दरम्यान, देशमुख बंधूंच्या ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार उज्ज्वला धोत्रे या प्रभाग तीनमधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे सहा प्रभागांतील 16 जागांसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये प्रभाग तीनमध्ये विजयसिंह देशमुख यांचे पुत्र अजितसिंह देशमुख विरुद्ध माजी सरपंच दाजी देशमुख यांच्यात सरळ लढत होत आहे. तर जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांचे पुत्र संग्राम विरुद्ध लक्ष्मण जाधव यांच्यात सामना रंगला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ गावंधरे यांच्या पत्नी राणी गावंधरे विरुद्ध सोनाबाई लिंगे यांच्यातील लढतीकडेही लक्ष लागले आहे. 

तिसऱ्या आघाडीचा पाठिंबाही देशमुखांनाच 
नेहमीच वसंतराव देशमुखांच्या विरोधात बंड करणाऱ्या हरी गावंधरे, बाळासाहेब शेख यांच्या तिसऱ्या आघाडीनेही देशमुख बंधूंच्या ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या तरी ग्रामविकास आघाडीचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे, 50 वर्षांनंतर प्रथमच एकत्रित आलेल्या देशमुख बंधूंच्या विरोधात समाधान आवताडे यांनी सर्वांना एकत्रित करत स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. यामध्ये देशमुख बंधूंवर नाराज असलेल्या काळे, भालके, परिचारक गटाच्या काही कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे येथील निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. राजकीय वैर विसरून एकत्रित आलेले देशमुख बंधू बाजी मारणार, की देशमुखांच्या विरोधात आलेले आवताडे गटाचे पॅनेल धक्कातंत्र देणार? याकडेच तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

गेल्या 50 वर्षांपासून गावात राजकीय वैर विसरून आम्ही तिन्ही देशमुख बंधू यंदा प्रथमच एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहोत. कोरोनाचे संकट, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि कोरोनामुळे तालुक्‍यातील नेत्यांचे झालेले दुर्दैवी निधन यामुळे तालुक्‍यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतु काही लोकांनी निवडणूक लावली आहे. गावच्या विकासाच्या जोरावर आमचे ग्रामविकास पॅनेल विजयी होईल, असा विश्वास आहे. 
- विजयसिंह देशमुख, 
माजी उपसभापती, पंचायत समिती, पंढरपूर 

ठळक वैशिष्ट्ये 

  • 50 वर्षांनंतर देशमुख बंधू एकत्र 
  • प्रमुख देशमुखांची दुसरी पिढी ग्रामपंचायतीच्या राजकारणात 
  • तिसऱ्या आघाडीनेही देशमुख बंधूंच्या ग्रामविकास आघाडीला दिला पाठिंबा 
  • निवडणुकीत बहुतांश तरुणांना संधी 
  • सुमारे 15 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forgetting political enmity the Deshmukh brothers from Kasegaon came together for the Gram Panchayat elections