माजी आमदारांच्या पत्नीने पतीची पेन्शन गोरगरिबांसाठी दिली ! प्रभाग नऊमधील झोपडपट्टी परिसरातून जातोय कोरोना 

तात्या लांडगे
Wednesday, 4 November 2020

ललिता लिंगराज वल्याळ यांनी पतीची पेन्शन गोरगरिबांसाठी दिली

जेलरोड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. आरोग्य शिबिरे घेऊन मोफत तपासणी केली आणि दुसरीकडे ऍन्टीजेन टेस्ट करण्यावर भर दिला. आर्सेनिक अल्बम गोळ्या पूर्ण प्रभागातील साडेतीन हजार कुटुंबाना वाटप केल्या. ललिता लिंगराज वल्याळ यांनी माजी आमदार लिंगराज वल्याळ यांच्या पेन्शनमधून अडीच हजार कुटुंबांना मोफत धान्य वाटप केले.

सोलापूर : शहरात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर या विषाणूचा प्रादुर्भाव झोपडपट्ट्यांमध्ये वाढेल, अशी भीती होती. त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागातील ज्येष्ठ नागरिक सुरक्षित राहतील, यादृष्टीने नियोजन केले. ललिता लिंगराज वल्याळ यांनी माजी आमदार लिंगराज वल्याळ यांच्या पेन्शनमधून अडीच हजार कुटुंबांना मोफत धान्य वाटप केले.

 

प्रभाग नऊमध्ये सर्वाधिक झोपडपट्टी परिसर असल्याने या प्रभागातील नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासात घरोघरी जेवण, धान्य वाटप केले. तर दुसरीकडे आरोग्य शिबिरे, रॅपिड ऍन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून संशयितांवर वेळेत उपचार केले. त्यामुळे हा प्रभाग सुरक्षित राहिला. प्रभागातील 60 वर्षांवरील व्यक्‍तींची यादी काढून त्यातून को-मॉर्बिड रुग्णांची माहिती दिली. कर्णिक नगर, पद्मा नगर, गिता नगर, एकता नगर, गांधी नगर परिसरातील लोकांची माहिती प्रशासनाला दिली. वॉर्डातील प्रत्येकाच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेतली. प्रत्येक कुटुंबासमोर रेड, हिरवा, केशरी रंगाचे मार्किंग करुन त्यांच्यावर वॉच ठेवला. पोलिस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. त्यानंतर परिवहनकडील बस मदतीला घेतल्या. दरम्यान, शहरातील 60 वर्षांवरील 340 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 31 ते 60 वयोगटातील 184 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र, सर्वाधिक झोपडट्टी असतानाही या प्रभागातील 20 रुग्णांचाच मृत्यू झाला आहे. प्रभागातील नगरसेविका राधिका पोसा, रामेश्‍वरी बिरु, नगरसेवक नागेश वल्याळ आणि अविनाश बोमड्याल यांनी परिश्रम घेतल्याने झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना वाढला नाही. 

प्रभागासंबंधी ठळक बाबी... 

  • आतापर्यंत 303 व्यक्‍ती बाधित 
  • एकूण रुग्णांपैकी 261 रुग्ण झाले बरे 
  • आतापर्यंत 20 रुग्णांचा झाला मृत्यू 
  • आता उरले अवघे 20 रुग्ण 

आठ दिवस नागरिकांना दिले घरपोच जेवण 
शहरातील सर्वाधिक झोपडपट्ट्या असलेला हा प्रभाग आहे. या प्रभागात कोरोना वाढू नये म्हणून सर्वच नगरसेवकांनी सुरवातीपासून जनजागृतीवर भर दिला. त्यानंतर घरोघरी धान्य वाटप केले. अन्नदाता बप्पा गणपती बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आम्ही आठशे ते एक हजार नागरिकांना आठ दिवस घरपोच जेवण दिले. जेणेकरुन ते घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित राहतील हा उद्देश होता. 
- राधिका पोसा, नगरसेविका 

को-मॉर्बिड कोरोनाला बळी ठरणार नाहीत याची घेतली दक्षता 
जेलरोड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. आरोग्य शिबिरे घेऊन मोफत तपासणी केली आणि दुसरीकडे ऍन्टीजेन टेस्ट करण्यावर भर दिला. आर्सेनिक अल्बम गोळ्या पूर्ण प्रभागातील साडेतीन हजार कुटुंबाना वाटप केल्या. कोरोना प्रभागात वाढणार नाही, यासाठी सर्वच नगरसेवकांनी चांगले काम केले आणि त्याला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्यासह महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेकांनी मदत केली. 
- नागेश वल्याळ, नगरसेवक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA's wife pays her husband's pension for the poor