शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांना विभागीय आयुक्तांचा दणका 

अण्णा काळे 
गुरुवार, 9 जुलै 2020

एकतर्फी निकाल, अपील करणार 
हे प्रकरण करमाळा दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्याच बरोबर उच्च न्यायालयाने देखील हे प्रकरण दिवाणी न्यायालयात सुरू असल्याने विरोधकांची याचिका फेटाळली आहे. लॉकडाउनच्या कालावधीत आम्हाला पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे कागदपत्रे सादरीकरण करण्यास जाता आलेले नाही. त्यामुळे हा एकतर्फी निकाल देण्यात आला आहे. आम्ही याबाबत अपील करणार आहोत. 
- बलभिम जाधव, उपसरपंच, जेऊर ग्रामपंचायत 

करमाळा (सोलापूर) : जेऊर (ता. करमाळा) ग्रामपंचायतने अनधिकृत गाळे बांधकाम केल्यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर अतिक्रमण जागेत बांधलेले अनधिकृत गाळे पाडले नसल्याच्या कारणाने जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता साळवे, उपसरपंच बलभीम जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून हटवण्याचे आदेश विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत. जेऊर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे हा माजी आमदार पाटील यांना धक्का असल्याचे समजले जात आहे. 
जेऊर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिल्याने आता ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकामार्फत केला जाणार आहे. जेऊर ग्रामपंचायतींच्या हाद्दीत अतिक्रमण करून अनाधिकृत गाळे बांधल्याची तक्रार देवानंद महादेव पाटील, बाळासाहेब एकनाथ कर्चे, बालाजी चंद्रकांत गावडे, धन्यकुमार अंबादास गारुडी, विठ्ठल न्यानो पंढरे (सर्व रा. जेऊर, ता. करमाळा) यांनी 5 जुलै 2017 रोजी पहिल्यांदा केली होती. त्यानंतरही त्यांनी तक्रारी केल्या आहेत. जेऊर ग्रामपंचायत हद्दीत लव्हे रोडवरील जनावरांचा दवाखाना, लव्हे रोड अंगणवाडी जवळ, लव्हे रोड ब्रिटिशकालीन विहीर, आठवडा बाजारात सोनार गल्ली व शाळा, मच्छिंद्र नुसते यांच्या घराजवळील सार्वजनिक शौचालय, खंडोबा मंदिर ते हनुमान मंदिरजवळ कोंढेज रोड, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर आदी ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे काढण्याबाबत तक्रारदाराने तक्रार केली होती. अतिक्रमणधारक व ग्रामपंचायत यांनी संगनमताने काम केले आहे, असे तक्रारीत नमूद केले होते. 
त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन अतिक्रमण काढण्याचे सांगितले होते. मात्र अतिक्रमणे हटवण्याबाबत सुचना देऊनही कारवाई न केल्याबद्दल सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 अन्वये कारवाई करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त यांच्याकडे शिफारस केली होती. यावरून विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी जेऊर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पदावरून हटवण्याचा आदेश दिले आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former ShivSena MLA Narayan Patil was hit by the divisional commissioner