'अधिकाऱ्यांच्या गावा'तील अधिकाऱ्याच्या कुटुंबावर काळाचा घाला ! कुटुंबातील चौघे ठार; मुलीचे शाळेचे स्वप्न अधुरे

Upalai Accident
Upalai Accident
Updated on

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण कुटुंब गावाकडे सोडलेले, परंतु सध्या कोरोनाचा कहर हळूहळू कमी होत असल्याने व लहान मुलीची शाळा देखील सुरू होत असल्याने कुटुंबीयांना व मुलीला मुंबईला घेऊन जात असताना खोपोलीजवळ नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबावर काळाने झडप घातली असून, यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुबंई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर मंगळवारी पहाटे वाहनांनी एकमेकांना धडक देऊन झालेल्या या भीषण अपघातात उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील रहिवासी असलेले व सध्या नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या झुंजारे कुटुंबावर काळाने झडप घातली आहे. यात झुंजारे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वैभव वसंत झुंजारे (41) यांच्यासह त्यांची आई उषा वसंत झुंझारे (63), पत्नी वैशाली वैभव झुंझारे (38) व लहान मुलगी श्रिया वैभव झुंझारे (5) यांचा मृत्यू झाला आहे. तर एक लहान मुलगा अर्णव वैभव झुंझारे (11) यात जखमी झाला आहे. 

उपळाई बुद्रूक येथील असलेले डॉ. वैभव झुंजारे हे गेली 10 ते 12 वर्षांपासून नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. गेले वर्षभर कोरोना महामारीने थैमान घातल्याने त्यांनी पत्नी, आई व लहान मुलांना गावाकडे वास्तव्यास सोडले होते व स्वतः महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरिकांच्या खबरदारीसाठी कोरोनाशी सामना करत होते. परंतु सध्याच्या परिस्थितीला कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने व लहान मुलीची शाळा सुरू होत असल्याने गावाकडे असलेले कुटुंब मुंबईला घेऊन जाण्यासाठी डॉ. झुंजारे हे नुकतेच गावाकडे आले होते. सोमवारी त्यांनी दिवसभर शेतात हुरडा पार्टी केली व रात्रीच्या वेळी ते मुंबईच्या दिशेने जात असताना खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

डॉ. झुंजारे हे मनमिळावू व प्रत्येकाला आपलेसे करणारे होते. लॉकडाउनच्या काळात त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरिकांच्या खबरदारीसाठी चांगल्या प्रकारे सेवा बजावली होती. महापालिकेतील शिपायापासून आयुक्तापर्यंत त्यांच्या कामाचा नावलौकिक होता. कोरोनावर मात करण्यासाठी ते अनेकांचे आधारवड बनले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने नवी मुंबई महानगरपालिकेसह उपळाई बुद्रूक गावावर शोककळा पसरली आहे. ते सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक वसंत झुंजारे यांचे सुपुत्र होते. तर त्यांच्या लहान चिमुकलीचे शाळेत जाण्याचे स्वप्न अधुरेच राहिले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

डॉ. वैभव झुंजारे हा भावासारखा होता. सर्वांशी मिळून मिसळून राहणारा मित्र आज हयात नसल्याचे विश्वासच बसत नाही. त्याचे व त्याच्या कुटुंबीयांचे असे अचानक जाणे हे माझ्यासाठी असहनीय आहे. 
- डॉ संदीप भाजीभाकरे, 
पोलिस उपायुक्त, मुंबई 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com