अक्कलकोट शहरातील चार, तळे हिप्परगा, बार्डी येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोना बाधित 

प्रमोद बोडके
Monday, 1 June 2020

ग्रामीण भागातही कोरोना पसरू लागला हात-पाय
सोलापूर शहरात कोरोनाने थैमान घातले असताना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, मोहोळ, माळशिरस, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिका क्षेत्र वगळून) आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत नवीन 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

आज दुपारी बारा वाजेपर्यंत ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 125 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 119 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दुपारी बारा वाजेपर्यंत आढळलेल्या सहा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अक्कलकोट शहरातील मधला मारुती गल्ली येथील दोन पुरुष, अक्कलकोट शहरातील उत्कर्ष नगर येथील एक महिला, अक्कलकोट शहरातील संजय नगर येथील एक पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिपरगा येथील एक महिला आणि पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील एका पुरुषाचा समावेश आहे. अक्कलकोटमध्ये आढळले चार रुग्ण हे यापूर्वीच्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिपरगा येथे आढळली कोरोना बाधित महिला ही नवी मुंबई येथून आलेली आहे. बार्डीमध्ये कोरोनाबाधित आढळलेला पुरुष हा पुण्यावरून आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण 42 जण कोरोना बाधित आहेत. त्यामध्ये 25 महिला 17 पुरुषांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील तीन पुरुष व दोन महिला अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून रूग्णालयात सध्या 32 जण उपचार घेत आहेत. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या पाच असल्याची माहितीही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four patients from Akkalkot city, one patient each from Tale Hipparga, Bardi infected corona