बापरे...सोलापूरच्या ग्रामीण भागातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू

प्रमोद बोडके
Saturday, 13 June 2020

अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली येथील 60 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुळेगाव येथील पारधी वस्ती येथील 71 वर्षीय पुरुष व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होटगी येथील 70 वर्षीय पुरुष अशा चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 116 झाली आहे. चौघांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 10 व्यक्तींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

आज दुपारी चारपर्यंत कोरोना चाचणीचे 81 रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यातील 75 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. सहा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली व बागवान गल्ली येथील प्रत्येकी एक महिला, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होटगी येथील एक पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नवीन विडी घरकुल येथील एक पुरुष व एक महिला, कुंभारी येथील अश्‍विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्वार्टस येथील एक पुरुष हे आज कोरोनाबाधित आढळले आहेत. अद्यापही कोरोना चाचणीचे 40 रिपोर्ट प्रलंबित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four people from rural areas of Solapur died due to corona