ब्रेकिंग ! 'ग्रामीण'ची चार पोलिस ठाणे सोलापूर शहरात होणार वर्ग; महासंचालकांचे पोलिस आयुक्‍तांना पत्र

तात्या लांडगे
Friday, 27 November 2020

प्रस्तावातील ठळक बाबी...

  • चिंचोली एमआयडीसी पोलिस ठाण्यापर्यंत असावी शहर पोलिस आयुक्‍तालयाची हद्द
  • तुळजापूर तालुक्‍यातील तामलवाडीपर्यंत शहर पोलिस आयुक्‍तालयाचा व्हावा विस्तार
  • कर्नाटक सिमेवरील मंद्रूप पोलिस ठाणे व परिसरातील गावांचा समावेश शहरात व्हावा
  • बोरामणीला विमानतळ होणार असल्याने बोरामणीपर्यंत पोलिस आयुक्‍तालयाची वाढवावी हद्द
  • एक पोलिस उपायुक्‍त अन्‌ उपलब्ध मनुष्यबळावर चालणार वाढीव पोलिस ठाण्यांचा कारभार

सोलापूर : पोलिस अधिक्षक असताना 25 ते 35 पोलिस ठाण्याचा कारभार आणि पोलिस आयुक्‍त असतानाही पाच ते सात पोलिस ठाण्याचाच कारभार पहावा लागत आहे. शहरीकरण वाढल्याने उपलब्ध मनुष्यबळात पोलिस आयुक्‍तालयाची हद्द वाढवून ग्रामीणमधील चार पोलिस ठाण्यांचा शहरात समावेश करावा, असा प्रस्ताव 9 मार्च 2020 रोजी पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात आला. त्यावर आता महासंचालकांनी पत्र पाठवून प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करुन आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

 

आठवड्यात जाईल पोलिस महासंचालकांना परिपूर्ण अहवाल 
शहराचा विस्तार वाढत असल्याने शहरालगत असलेल्या गावांपर्यंत शहर पोलिस आयुक्‍तालयाची हद्द असावी, असा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्रुटी पूर्ततेचे पत्र प्राप्त झाले असून आठवड्यात त्याची पूर्तता करुन तो प्रस्ताव पाठविला जाईल.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त

 

शहर आणि ग्रामीणमधील संबंधित चार पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण किती आहे, वळसंग पोलिस ठाण्याअंतर्गत किती गावे शहरीकरणात येतात आणि वळसंग पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांची यादी द्यावी. तसेच उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापुरातील किती गावांचे शहरीकरण झाले आहे, तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत किती गावे आहेत, या पोलिस ठाण्याअंतर्गत शहरीकरण झालेल्या गावांची यादी पोलिस महासंचालकांनी मागविली आहे. तर मंद्रूप पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांचीही यादी मागविण्यात आली आहे. आता पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे यांच्या माध्यमातून त्रुटींची पूर्तता केली जात आहे. त्रुटींची पूर्तता केल्यानंतर ग्रामीणमधील जी पोलिस ठाणे शहरात वर्ग केली जातील, त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी, असेही पोलिस महासंचालकांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे. वाढीव पोलिस ठाण्यांसाठी मिळणार एक पोलिस उपायुक्‍त आणि उपलब्ध मनुष्यबळावर या पोलिस ठाण्याचा कारभार केला जाईल, असेही त्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. आता पुढील आठवड्यात त्रुटींची पूर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव महासंचालकांना पाठविला जाणार आहे.

 

प्रस्तावातील ठळक बाबी...

  • चिंचोली एमआयडीसी पोलिस ठाण्यापर्यंत असावी शहर पोलिस आयुक्‍तालयाची हद्द
  • तुळजापूर तालुक्‍यातील तामलवाडीपर्यंत शहर पोलिस आयुक्‍तालयाचा व्हावा विस्तार
  • कर्नाटक सिमेवरील मंद्रूप पोलिस ठाणे व परिसरातील गावांचा समावेश शहरात व्हावा
  • बोरामणीला विमानतळ होणार असल्याने बोरामणीपर्यंत पोलिस आयुक्‍तालयाची वाढवावी हद्द
  • एक पोलिस उपायुक्‍त अन्‌ उपलब्ध मनुष्यबळावर चालणार वाढीव पोलिस ठाण्यांचा कारभार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four police stations in rural Solapur will be included in the Solapur city