माळशिरस तालुक्‍याच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण ! चार वर्षांनंतर सुरू झाला शंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 

Shankar Sugars
Shankar Sugars

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍याच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आज उगवला. त्याला कारण आहे, सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा आज 47 वा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे. माळशिरस तालुक्‍यातील सर्व सहकारी संस्थांचे संचालक, कारखान्याचे हजारो सभासद, कामगार व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. 

शंकर सहकारी साखर कारखान्याची स्थापना सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील यांनी 1967 मध्ये चितळे यांचा खासगी साखर कारखाना विकत घेऊन, तो खासगी न करता सहकारी तत्त्वावर सुरू केला, अशी याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आर्थिक अडचणीमुळे मागील चार वर्षांपासून हा कारखाना बंद होता. सलग पाचव्या वर्षी हा चाचणी हंगाम कारखान्याचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व त्यांच्या संचालक मंडळाच्या अथक परिश्रमातून सुरू होत आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील, रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील, लोकनेते प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्या प्रतिमांचे या वेळी पूजन करण्यात आले. 

या वेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, 2016 पासून अवसायनात काढून हा कारखाना खासगीकरण करून विकला जाणार होता. 2018 मध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आले. हा कारखाना सुरू व्हावा अशी पंचक्रोशीतील लोकांची भावना होती. सगळ्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कारखाना सुरू होत आहे. हा कारखाना सुरू होण्यासाठी शंकरनगर साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळदादा मोहिते- पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. 1968 मध्ये सुद्धा शंकरनगर कारखाना सुरू होण्यासाठी फार मोठी मदत केली होती. 1969- 70 या पहिल्या गळीत हंगामात सात हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब देसाई उपस्थित होते. हा कारखाना उभा करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने, सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील, नानासाहेब देशमुख, विष्णुपंत कुलकर्णी, सालगुडे पाटील, पंढरीनाथ दाते यांनी खारीचा वाटा उचललेला आहे. 

मला या ठिकाणी कुणावरही टीकाटिप्पणी करायची नाही, आरोप करायचे नाहीत. दोन-तीन पिढीचे नाते या संस्थेशी निगडित आहे. कारखाना बंद असल्यामुळे संपूर्ण तालुक्‍यातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला होता. अनेक मशिनरींच्या तांत्रिक दुरुस्त्या, टर्बाइनच्या दुरुस्त्या अशी अनेक कामे करणे गरजेचे होते. कोरोनाच्या काळामुळे ही कामे होण्यास वेळ लागला. साडेसतरा मेगावॉट क्षमतेने वीजनिर्मिती होणार आहे. सहकार महर्षी साखर कारखानाएवढा आपणही दर देणार आहोत. मागील देणी टप्प्या- टप्प्याने देणार आहोत. कोणाचाही एक रुपया बुडवला जाणार नाही. शेतकरी आणि कामगार हे केंद्रबिंदू मानून माझे काम सुरू आहे. अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये. 7 हजार शेतकऱ्यांची ही संस्था आहे. भूलथापांना कुणी बळी पडू नये. सगळ्यांचे पैसे द्यायची माझी जबाबदारी आहे, ती मी स्वीकारलेली आहे. गतवैभव प्राप्त करायचे आहे. 

ऍड. अभिजित कुलकर्णी म्हणाले, हा कारखाना अवसायनात निघाला होता. खासगीकरणातून बाहेर काढायचे होते. त्या वेळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शेतकरी आणि कामगारांना प्राधान्य द्यायचे आहे, असे स्पष्ट मला सांगितले होते. व्यक्तिद्वेषातून तक्रारी वाढलेल्या दिसून येतात. सभासदांनी अपप्रचारापासून लांब राहणे गरजेचे आहे. सहकार महर्षींच्या वेळी ज्या आर्थिक अडचणी होत्या त्याच आर्थिक अडचणी आज रणजितदादा यांच्यापुढे आहेत. नियतीचा काय संकेत आहे? सहकार महर्षीचे सर्व गुण नातवामध्ये दिसून येतात. सगळ्यांनी एकी दाखवावी. सहकार्याचे स्वप्न माणुसकी आहे. चालू संस्थेकडे पाहण्याचा बॅंकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. यापुढे या कारखान्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी मला खात्री आहे. 

ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते- पाटील म्हणाले, या कारखान्यात मी पंधरा वर्षांनंतर आलो आहे. शासन दरबारी रणजितसिंहांमुळे अडचणी दूर झाल्या आहेत. पाच वर्षांनंतर या कारखान्याचा सीझन सुरू होत आहे. चाचणी हंगामात 50 हजार मेट्रिक टन गळिताचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व सभासदांना विनंती आहे, की सर्वांना एफआरपीप्रमाणे पैसे मिळतील, मागील देणेसुद्धा मिळेल, एवढा मी शब्द देतो. नैसर्गिक परिस्थिती चांगली आहे. 

ठळक... 

  • पुढील वर्षी चार लाख गळीत होणार 
  • बाबाराजे देशमुख, सुचित्रादेवी देशमुख यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली 
  • 322 कोटींचे कर्ज आहे, परंतु 443 कोटींची मालमत्ता आहे. 
  • 50 वर्षांपूर्वी दिगंबर धोंडीबा निंबाळकर या शेतकऱ्याची पहिली उसाची गाडी आली होती, ती आजही उसाची पहिली गाडी आली आहे. 
  • पाच वर्षे बंद पडलेला कारखाना सुरू झाल्याने या भागात नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येते 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com