उपळे दुमाला येथे दोन गटांत तलवार, कोयता व दगडांनी हाणामारी ! चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल

कुलभूषण विभूते 
Saturday, 31 October 2020

उपळे दुमाला (ता. बार्शी) येथे तांबारे-साळुंखे या दोन गटांत हाणामारी झाली. पूर्ववैमनस्यातून व शेतीच्या कारणावरून दोन गटात तलवार, कोयता, काठ्या व दगडांनी जबर हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्याने वैराग पोलिस स्टेशनला तीन महिलांसह चौदा जणांविरोधात जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटांचे चारजण जखमी झाले आहेत. 

वैराग (सोलापूर) : उपळे दुमाला (ता. बार्शी) येथे तांबारे-साळुंखे या दोन गटांत हाणामारी झाली. पूर्ववैमनस्यातून व शेतीच्या कारणावरून दोन गटात तलवार, कोयता, काठ्या व दगडांनी जबर हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्याने वैराग पोलिस स्टेशनला तीन महिलांसह चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटांचे चारजण जखमी झाले आहेत. 

याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी किशोर काशिनाथ साळुंखे यांचे वडील काशिनाथ त्रिंबक साळुंखे यांचा शेताच्या कारणावरून 28 फेब्रुवारी 2016 रोजी शेतीच्या वादातून खून झाला होता. त्या प्रकरणातील संशयित आरोपी निर्दोष सुटले होते. झालेले प्रकरण मिटवायचे आहे, तुम्ही शेताकडे या, असे तंटामुक्त समिती व गावातील प्रमुखाचे ठरले होते. त्यामुळे साळुंखे गटाचे किशोर साळुंखे व त्यांचे दाजी अमोल शत्रुघ्न तांबारे, रणजित तांबारे हे शुक्रवारी (ता. 30) सकाळी दहाच्या सुमारास शेताकडे जात होते. ते मुंगशी - झाडी चौकात आले असता दिनेश रामलिंग साळुंखे, दादाराव रामलिंग साळुंखे, दशरथ रामलिंग साळुंखे, रामलिंग त्रिंबक साळुंखे यांनी शेतीच्या भांडणाचा वाद उकरून "तुलाही जिवे ठार मारायचे आहे' असे रागाने म्हणत शिवीगाळ करून तलवार, कोयता व काठीने मारहाण केली. तर मंगल रामलिंग साळुंखे, सोनाली दादाराव साळुंखे व अश्विनी दिनेश साळुंखे (सर्व रा. उपळे दुमाला, ता. बार्शी) यांनी त्यांना साथ देत दगडाने मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद साळुंखे गटाकडून किशोर काशिनाथ साळुंखे यांनी दिली. 

तर मागील भांडणाचा राग मनात धरून तसेच "तुमची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली' म्हणून चिडून जाऊन तांबारे गटाचे अमोल शत्रुघ्न तांबारे, किशोर काशिनाथ साळुंखे, रणजित शिवाजी तांबारे, तानाजी हरिबा तांबारे, लक्ष्मण राजेभाऊ तांबारे, अमोल आनंता नाईकवाडी, पांडुरंग अण्णा नाईकवाडी यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, कोयता, काठी व दगडाने मारहाण केल्याची फिर्याद दिनेश रामलिंग साळुंखे यांनी वैराग पोलिसांत दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाळे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen people have been booked in connection with a fight between two groups at Upale Dumala