लॉकडाउनमध्ये सुरू आहे पक्ष्यांचा मुक्त संचार

सूर्यकांत बनकर
रविवार, 5 एप्रिल 2020

लॉकडाउनमुळे पक्षी जीवनाला त्रासदायक ठरणारी वाहनांची व कारखान्यांची धडधड थांबली आहे. कर्ब उत्सर्जन शून्यावर येऊन हवा आणि पाण्याचेही प्रदूषण कमालीचे कमी झाले आहे. मानवास सक्तीने घरातच क्वारंटाइन करून घ्यावे लागले आहे. त्यामुळे पक्ष्यांना कोणत्याही त्रासाशिवाय अवघे अवकाश खुले झाले आहे. साहजिकच जैवविविधतेतील एक प्रमुख घटक असलेले हे पक्षी या वातावरणात मुक्त संचार करताना दिसत आहेत.
 

करकंब (सोलापूर) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरात हाहाकार उडालेला असताना पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या पक्ष्यांना मात्र कधी नव्हे एवढे मुक्त स्वातंत्र्य मिळाल्याचे चित्र आहे. हवा आणि ध्वनी प्रदूषण थांबल्यामुळे पक्षी सुसह्य जीवन जगत असल्याचे मत पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, सध्या अनेक पक्ष्यांचा विणीचा काळ चालू असल्याने अशा पक्ष्यांसाठी लॉकडाउन फलदायीच ठरले आहे.

हेही वाचा - रस्त्यावर येणारी सर्व वाहने होत आहेत जप्त!

पक्षीप्रेमींसाठी पक्षी निरीक्षणाची संधी
भूतलावर अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांच्या एकूण प्रजातींपैकी निम्म्याहून अधिक पक्षी चैत्र व वैशाख महिन्यात संतानोत्पत्तीच्या कामाला लागतात आणि नेमके याच वेळी या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. परिणामी, पक्षी जीवनाला त्रासदायक ठरणारी वाहनांची व कारखान्यांची धडधड थांबली आहे. कर्ब उत्सर्जन शून्यावर येऊन हवा आणि पाण्याचेही प्रदूषण कमालीचे कमी झाले आहे. मानवास सक्तीने घरातच क्वारंटाइन करून घ्यावे लागले आहे. त्यामुळे पक्ष्यांना कोणत्याही त्रासाशिवाय अवघे अवकाश खुले झाले आहे. साहजिकच जैवविविधतेतील एक प्रमुख घटक असलेले हे पक्षी या वातावरणात मुक्त संचार करताना दिसत आहेत. ही पक्षीप्रेमींसाठी पक्षी निरीक्षणाची एक संधीच आहे. 22 मार्च रोजी पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू व त्यानंतरच्या लॉकडाउनच्या काळात आपल्या परिसरात पक्ष्यांचा मुक्त वावर वाढल्याचे मत पक्षी निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात आढळत असलेले पक्षी
सध्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिकारी पक्षी तसेच माळारानावर वावर असणारे सातभाई, खाटीक, चंडोल, बुलबुल, माळटिटवी, धाविक, तित्तर, लाव्हा, होला, गायबगळे, खंड्या, कावळे, चिमणी, दयाळ, चष्मेवाला, शिंजीर (सूर्यपक्षी), शिंपी, वटवट्या, वेडा राघू, नाचण, तांबट, साळुंखी, ब्राह्मणी मैना, सुतार पक्षी, कोतवाल, पांढऱ्या कंठाची मुनिया, धोबी, आदी प्रकारच्या पक्षांचा मुक्त वावर असल्याचे दिसून येत आहे. पाणथळींना जवळिकता साधून राहणारे चित्रबलाक, चमचेचोच (दर्वीमुख), कुदळेज्ञ (शराटी), राखी बगळे इत्यादी पक्षी घरटी बांधून आपल्या नव्या पिढीला जन्म घालण्याच्या लगबगीत आहेत. अनेक पक्षी घरटी बनविण्याच्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत.

मानवजातीला धोका निर्माण करू पाहणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे पक्ष्यांच्या जीवनशैलीत चैतन्य निर्माण झालेले दिसून येते. पक्ष्यांच्या प्रजातीतील निम्म्या प्रजाती चैत्र व वैशाखात संतानोत्पत्तीसाठी सज्ज होतात. वाहनांचा वापर व मनुष्यजीवन ठप्प झाल्यामुळे वातावरणातील प्रदूषणाला आळा बसला आहे. त्यामुळे सध्या अनेक पक्षी सुसह्य जीवन जगत आहेत.
- डॉ. अरविंद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free flying of birds in lockdown