हवामान बदलामुळे फळ उत्पादक शेतकरी हवालदिल; डाळिंब, द्राक्ष, बोर बागांवर रोगराई

दत्तात्रय खंडागळे 
Sunday, 29 November 2020

यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा ढगाळ वातावरण व अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरी व मध्येच पडणारी बोचरी थंडी अशा हवामान बदलामुळे सांगोला तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्षे, बोर इत्यादी फळपिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. बागांवर रोगराई पसरु नये म्हणून शेतकरी सतत महागडी औषधांची फवारण्या करीत आहेत. या हवामान बदलाने मात्र फळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. 

सांगोला (सोलापूर) : यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा ढगाळ वातावरण व अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरी व मध्येच पडणारी बोचरी थंडी अशा हवामान बदलामुळे सांगोला तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्षे, बोर इत्यादी फळपिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. बागांवर रोगराई पसरु नये म्हणून शेतकरी सतत महागडी औषधांची फवारण्या करीत आहेत. या हवामान बदलाने मात्र फळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. 
तालुक्‍यात अतिवृष्टीने याअगोदरच फळपिकांबरोबरच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्‍यातील प्रमुख पीक असलेल्या डाळिंबीचा बहार आतापर्यंत वाया गेला होता. फळधारणा झालेल्या डाळिंबावर फळकूज, कुजवा, मावा, डाग, थ्रीप्स यासारखे विविध रोग मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. बहार धरलेल्या बागांवर फुलगळतीमुळे फळधारणा झालेले नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. महिनाभरापासून बहर धरण्यासाठी वातावरण तयार झालेले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण त्यातच अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरी व रात्री पडणारी बोचरी थंडी, अशा हवामान बदलामुळे पुन्हा एकदा डाळिंब बरोबरच द्राक्ष, बोर इत्यादी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. 
द्राक्षावर लहानघड गळती, दावण्याचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे बोरांचे परिपक्व होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बागांमध्ये परिपक्व होवून गळती झाल्याने बोरांचे नुकसान होवू लागले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना अध्याप अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानभरपाई मिळायची आहे. यातच सध्याच्या हवामान बदलामुळे फळ पिकांवर रोगराई होऊ नये म्हणून शेतकरी नानाविध प्रकारची महागडी औषधे बागांवर फवारणी करीत आहे. फवारणी करूनही रोगराई आटोक्‍यात येत नसल्याने फळ उत्पादक शेतकरी सध्या सतत होणाऱ्या या हवामान बदलामुळे चिंताग्रस्त झाला आहे. 
द्राक्ष व डाळिंब उत्पादक दामोदर पवार म्हणाले, सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे डाळिंब, द्राक्ष फळबागांवर रोगराईच्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या फळ उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. हवामान बदलाने फळगांवर सतत फवारणीसाठी खर्च करावा लागत आहे. 
शेतकरी अनिल शिनगारे म्हणाले द्राक्ष बागांमध्ये घड जिरण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अतिवृष्टी व सध्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणणे कठीण झाले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fruit growers in sangola taluka are worried about climate change