रिक्षातील प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड ! डीपी दुरुस्तीसाठी लाच घेणारा वायरमन पकडला अन्‌ पुढे... 

1cogivmon_0.jpg
1cogivmon_0.jpg

सोलापूर : रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना लुटणाऱ्या चार महिलांना फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने 24 तासांत पकडले. कोंडी ते सोलापूर असा प्रवास करणाऱ्या मिनाक्षी वसंत माने (रा. सेलगाव, ता. करमाळा) यांच्याकडील 18.5 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (ता. 9) सापळा रचून चौघींना अटक केली. लक्ष्मी बद्री पवार, पद्मिनी शिवाजी भोसले, सुरेखा बाबू भोसले आणि ममता संभाजी भोसले (रा. बिस्मिल्ला नगर, पारधी कॅम्प, मुळेगाव रोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 


डीपी दुरुस्तीसाठी लाच घेणारा 
वायरमन लाचलुचपतच्या जाळ्यात 

सोलापूर : कांदा लावगडीसाठी पाणी लागणार होती, पंरतु वीजेची समस्या असल्याने तक्रारदाराने वायरमनकडे बाणेगाव येथील डीपी दुरुस्तीची मागणी केली. त्यावेळी वायरमन सुभाष दत्तात्रय हिप्परगी (बाणेगाव, महावितरण शाखा कार्यालय कारंबा) याने सर्व शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपयांची लाच मागितली. ठरलेल्या रकमेतील दिड हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिप्परगीला रंगेहाथ पकडले. तालुका पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ऍन्टी करप्शन ब्युरोचे उपअधिक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली. 


मटका बुकीतील आठ जणांना पोलिस कोठडी 
सोलापूर : अशोक चौक परिसरातील मटका बुकीवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक सुनिल कामाठी याचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, या अवैध व्यवसायातील भागिदारांसह पोलिसांनी आतापर्यंत 288 संशयित आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यातील दोन भागीदार, चार लाईनवरील संशयितांशिवाय 22 जणांना अटक केली आहे. मंगळवारी (ता. 8) अटक केलेल्या आठजणांना न्यायालयाने 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. शहरात मटका बुकीचा अवैध व्यवसाय करणाऱ्या कामाठीविरुध्द पोलिसांनी कारवाईचा पाश आवळला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई स्टिफन स्वामीला बडतर्फ केले आहे. आता निष्पन्न झालेल्या संशयित आरोपींचा पोलिस शोध घेऊ लागले आहेत. दरम्यान, बुधवारी (ता. 9) पोलिसांनी व्यंकटेश चिंता, अब्दूलरशिद चर्के, कृष्णमुर्ती सालमेरी, मल्लेशम सुरायापल्ली, जब्बार शेख, खाजादाऊद कय्यूम, रेवणसिध्द पोगूल आणि कय्यूम शेख या संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले होते. 

दुकाने फोडून चोरी करणाऱ्याला अटक 
गुरुनानक चौकातील गुरुदत्त हौसिंग सोसायटीतील मोबाइल रिपेअरिंगच्या दुकानातून दुरुस्तीचे साहित्य, त्याशेजारील पानशॉप आणि कॅन्टीनचे कुलूप तोडून एक हजार 60 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. ही घटना रविवारी (ता. 6) घडल्यानंतर संबंधितांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी खबऱ्यांमार्फत चोरट्याचा शोध सुरु केला. बुधवारी (ता. 9) त्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी कुमठा नाका येथे सापळा रचून त्याला अटक केली. राकेश उर्फ राक्‍या मारुती बनसोडे (वय 22, रा. तक्षशिला नगर, जांबुमनी शाळेमागे, कुमठा नाका) असे त्या चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. 

शिक्षिकेच्या घरात दिड लाखांची चोरी 
जुना पुना नाका परिसरातील अवंती नगरात राहणाऱ्या भाग्यश्री चिदानंद स्वामी या शिक्षिकेच्या घरातून चोरट्याने एक लाख 64 हजार 500 रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत. ही घटना बुधवारी (ता. 9) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी स्वामी यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तत्पूर्वी, भाग्यश्री स्वामी या सकाळी वसुंधरा कॉलेजला ड्यूटीवर तर आई एका खासगी हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेल्या. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि साडेचार हजार रुपये रोख, असा मुद्देमाल लंपास केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शहर पोलिसांची बेशिस्त वाहनांवर कारवाई 
शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालविणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी सात रस्ता यासह अन्य ठिकाणी नाकाबंदी करुन बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. 165 वाहने आणि 155 विनामास्क फिरणाऱ्या व्यक्‍तींकडून पोलिसांनी 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. 

अतिक्रमण विभागाला बोलावले म्हणून मारहाण 
महापालिकेची गुरे अतिक्रमणाची गाडी का बोलावली असा जाब विचारत सातजणांनी अश्‍पाक राजेसाब जातकर यांना शिवीगाळ केली. मी गाडी बोलावली नाही, असे सांगत असतानाच त्यांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर आश्‍पाक जातकर (रा. भवानी पेठ, मड्डी वस्ती) यांनी जोडभावी पोलिसांत त्यांच्याविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार बाशाभाई जातकर, गुल्लामाबी बाशा जातकर, मत्तन्ना जातकर, दादन जातकर, रफिक बाशा जातकर, मक्‍तूम जातकर, रियाज जातकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

क्रेडिट कार्डद्वारे 
तीनशे युएस डॉलरची फसवणूक 

उमा सहकारी गृहनिर्माण संस्था, जुनी मिल येथील प्रशांत रमाकांत वाघ यांच्या क्रेडिट कार्डवरुन तीनशे युएस डॉलरची वायसॅट खरेदी करण्यात आली. तसा मेसेज वाघ यांना त्यांच्या मोबाईलवर आला. त्यानंतर त्यांनी आरबीएल बॅंकेच्या कॉल सेंटरला कळवून क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. तरीही पुन्हा एकदा क्रेडिट कार्डवरुन काहीतरी वस्तू खरेदीचा प्रयत्न झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर वाघ यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले आणि संबंधिताविरुध्द फिर्याद दिली. 

बंद घरातून 63 हजारांचा मुद्देमाल लंपास 
शहरातील न्यू धोंडीबा वस्ती येथील रहिवासी सुनिल गौवडप्पा बसनाळ हे काही कामानिमित्त त्यांच्या मूळगावी लिंबाळ (इंडी, कर्नाटक) येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घरातील 63 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद बसनाळ यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. फिर्यादीनुसार चोरट्याने घरातील 43 हजार 750 रुपये किंमतीचे दागिने, पाच हजारांच्या दोन पितळी टाक्‍या, चार पितळच्या घागरी, दोन पितळीचे डबे, एक मिक्‍सर आणि आठ हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरट्याने नेला आहे. 


पोलिस आयुक्‍तांनी व्यक्‍त केली चिंता 
अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्याने सुरु झाल्यापासून नियमांचे उल्लंघन वाढले आहे. लॉकडाउन काळात शहरवासियांना सहकार्य केल्याने कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात येण्यास मोठी मदत झाली. मात्र, आता बाजारपेठांमध्ये तथा इतरत्र ये-जा करणाऱ्यांकडून नियमांचे तंतोतंत पालन केले जात नाही. त्यामुळे संसर्ग पुन्हा वाढू लागल्याची चिंता पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी व्यक्‍त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी व्यापारी, खरेदीदार, नोकदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तोंडाला मास्क लावावा व स्वच्छतेचे पालन करावे. खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर कोणत्याही वस्तुला हात लावू नये, असे आवाहन पोलिस आयुक्‍तांनी केले आहे. 

अलहिलाल बिझनेस कनसेप्टकडून फसवणूक 
सोलापूर : विजयपूर रोडवरील वाटरप्रूफ बिल्डींग येथील अलहिलाल बिझनेस कनसेप्ट प्रा. लि.ने शहरातील ठेवीदारांना मंथली पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यास लावले. ज्यादा रकमेचे अमिष देऊनही त्यांनी डिसेंबर 2019 पासून गुंतवणूकदारांना रकमेची परतफेड बंद केली. कार्यालयासही कुलूप लावण्यात आले आहे. याप्रकरणी सर्फराज शेख यांनी या कंपनीचे संचालक आकिबखान हारूणखान पठाण व अलिनवाज इमामहुसेन सय्यद यांच्याविरुध्द विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. 
या कंपनीने शंभरहून अधिक ठेवीदारांकडून 2017 पासून सुमारे तीन कोटी 23 लाख पाच हजार 500 रुपये मंथली पेन्शन योजनेत घेतले. या प्रकरणात पोलिसांनी अलिनवाज सय्यद याला अटक केली आहे. दरम्यान, या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांनी पोलिस आयुक्‍तालयात संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी केले आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com