माळशिरसमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळ्या जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

गेल्या दोन महिन्यांत चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या टोळीने पोलिसांची पुरती झोप उडवली आहे. परिसरात चोरांच्या धास्तीने नागरिक हैराण झाले आहे. यामुळे पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असतानाच पोलिसांनी चोर पकडण्यासाठी मोहीम हाती घेतलीआहे. यातून दोन वेगवेगळ्या टोळ्या पकडल्या आहेत. 

10 लाखांचा मुद्देमाल जप्त, सात गुन्हे निष्पन्न 
माळशिरस (जि. सोलापूर) ः रात्रीची गस्त घालत असताना संशय बळावल्याने दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चोरट्यांना माळशिरस पोलिसांनी 10 लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात पोलिस रेकॉर्डवर सात गुन्हे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्‍वंभर गोल्डे यांनी दिली. 
गेल्या दोन महिन्यांत चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या टोळीने पोलिसांची पुरती झोप उडवली आहे. परिसरात चोरांच्या धास्तीने नागरिक हैराण झाले आहे. यामुळे पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असतानाच पोलिसांनी चोर पकडण्यासाठी मोहीम हाती घेतलीआहे. यातून दोन वेगवेगळ्या टोळ्या पकडल्या आहेत. 
पोलिस गस्त घालताना संशय बळावल्याने दरोड्याच्या तयारीत असलेली पहिली टोळी मोटेवाडी येथून पकडली. त्यांच्याकडून करवत, कोयता, मिरची पूड अशा वस्तू ताब्यात घेतल्या. दुसरी टोळी माळशिरस, भंडीशेगाव येथे राहत असल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या राहत्या माळशिरसमधील खोलीशेजारी दबा धरून होते. आरोपी तेथे आले. गाडीतून उतरून खोलीकडे गेले; मात्र त्यांना पोलिसांचा संशय येताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांना धक्का देत ते वापरत असलेल्या चोरीच्या कारमध्ये जाऊन बसले. गाडी सुरू केली अन्‌ थेट पोलिसांच्या अंगावर घातली. प्रसंगावधानाने पोलिस बचावले. समोरून प्रतिकार होताच गाडी रिव्हर्सने पळविण्यास सुरवात झाली. या वेळी नागरिक व पोलिसांच्या पथकाने गाडी अडवली व तेथे जमलेल्या लोकांनी काचा फोडून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. या थरारानंतर पोलिसांनी दोन्ही टोळ्या जेरबंद केल्या. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 25 ते 30 गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे. 
चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून हद्दीतील सात व इतर एक गुन्हा निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 10 लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलिस निरीक्षक यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजू पवार, कृष्णा काळे (रा. पेनूर), किरण काळे (रा. मोटेवाडी), दोन्ही टोळ्यांतील आरोपींच्या मुसक्‍या आवळत चंदन विकत घेणारा प्रदीप ऊर्फ भाऊ मदने (रा. झिंजेवस्ती पिलीव) व चोरीचे सोने विकत घेणारा ओंकार अष्टेकर (रा. पंढरपूर) यांना ताब्यात घेतले. यात 14 मोबाईल, दोन टीव्ही, दागिने, चारचाकी गाडी असा 10 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 
पोलिस निरीक्षक विश्‍वंभर गोल्डे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अजिनाथ महानवर, सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, सचिन हेंबाडे, विकी घाडगे, सोमनाथ माने, समीर पठाण, समाधान शेंडगे, अमोल बकाल, सुभाष पावरा, सुनीता केंगले, बापूसाहेब कोकाटेसह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. 
महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The gangs preparing for the robbery in Malsheras was arrested