विधानसभा पोटनिवडणुकीची हालचाल सुरू ! मंगळवेढा भाजप तालुकाध्यक्षपदी बुरकुल यांची निवड 

हुकूम मुलाणी 
Wednesday, 6 January 2021

गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संतोष भोगले यांची निवड करण्यात आली होती. त्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष शहरातला व तालुकाध्यक्ष ग्रामीण भागातील असावा, असा सूर व्यक्त केला. याबाबत पक्षाच्या नेतृत्वाकडे तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. 

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी विद्यमान शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात दिले. यामुळे तालुक्‍यात राजकीय हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संतोष भोगले यांची निवड करण्यात आली होती. त्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष शहरातला व तालुकाध्यक्ष ग्रामीण भागातील असावा, असा सूर व्यक्त केला. याबाबत पक्षाच्या नेतृत्वाकडे तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. परंतु, सध्या आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. शिवाय सध्या 22 ग्रामपंचायतींचा आखाडाही सुरू झाला आहे. तर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत परिचारक समर्थकांनी दामाजी कारखान्याची निवडणूक लढण्याचा निर्धार नुकताच व्यक्त केला. त्यानंतर तालुक्‍यामध्ये राजकीय हालचाली होण्यास सुरवात झाली आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सर्व प्रकारांकडे गांभीर्याने घेतली असून, सर्वसमावेशक चेहरा म्हणून गौरीशंकर बुरकुल यांना तालुकाध्यक्ष म्हणून निवडले. तर संतोष मोगले यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांचा आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, युन्नूस शेख, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडेकर, अशोक माळी, अरुण किल्लेदार, नागेश डोंगरे, मधुकर चव्हाण, संतोष मोगले, बबलू सुतार व दीपक माने आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gaurishankar Burkul has been selected as the BJP taluka president of Mangalwedha taluka