
पांढऱ्याशुभ्र धवल रंगाच्या या खोंडाचा त्यांना एवढा लळा लागला आहे, की तो "संग्राम' नावाचा खोंड म्हणजे आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच ते त्याचा सांभाळ करीत आहेत. त्याला दररोज स्वच्छ धुणे, सकाळ - संध्याकाळी पेंड, कणकीचे गोळे न चुकता ते त्याला चारतात.
वाळूज (सोलापूर) : सव्वीस वर्षांत एकदाही स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही; मात्र हौसेखातर बैल पाळण्याचा छंद जोपासणाऱ्या घाटणे (ता. मोहोळ) येथील शेतकरी पुत्र राहुल भलभले यांनी घरच्या गाईच्या "खिलार खोंडा'चा म्हणजेच "संग्राम'चा पहिला वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला आहे.
पांढऱ्याशुभ्र धवल रंगाच्या या खोंडाचा त्यांना एवढा लळा लागला आहे, की तो "संग्राम' नावाचा खोंड म्हणजे आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच ते त्याचा सांभाळ करीत आहेत. त्याला दररोज स्वच्छ धुणे, सकाळ - संध्याकाळी पेंड, कणकीचे गोळे न चुकता ते त्याला चारतात. हल्ली श्रीमंत घरातील युवक - युवतींसह सर्वसामान्य लोकही आपला वाढदिवस पैशांची उधळण करीत डामडौलात साजरा करीत असतात. तर विविध पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवस त्यांचे कार्यकर्ते चौकाचौकात, रस्त्यावर आकाशाला भिडणारी होडिग्ज लावून तसेच फटाक्यांच्या माळा, गुलाल उधळून, जेवणावळी, रंगीबेरंगी औटगोळे उडवून साजरे करत असतात. हे आता काही नवीन नाही. मात्र, 26 वर्षांत स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा न करता राहुल भलभले यांनी आपल्या आवडत्या खोंडाचा पहिला वाढदिवस (1 जानेवारी 2021) रोजी दणक्यात साजरा केला आहे. त्यासाठी त्यांनी वाढदिवसाची जंगी तयारी केली होती.
300 रुपयांचा खास बनवलेला आईसकेक, गुलाबाचे दोन हार, उपस्थित मित्रमंडळींना वाढदिवसाची पार्टी म्हणून पन्नास वडापाव मागवले होते. फोटो काढण्यासाठी मोहोळहून खास छायाचित्रकार बोलावला होता. तो बैलाचे फोटो काढायचे म्हटल्यावर येणार नाही म्हणून त्याला आपलाच वाढदिवस आहे, असे खोटेच सांगून बोलावून घेतले होते. या संग्रामसाठी खास पाट आणला होता. मात्र खोंडाने पाय ठेवताच तो पाट मोडला म्हणून त्यांनी मित्राच्या डोक्यावर चौरंग ठेवून संग्रामला पुढचे दोन्ही पाय त्या चौरंगावर ठेवायला लावले होते. राहुल यांनी केक कापून संग्रामला ओवाळले व त्याला केक खाऊ घातला. या वेळी सर्व उपस्थितांनी संग्रामला वाढदिवसाचे अभीष्टचिंतन केले.
राहुल भलभले यांचे वडील सुभाष भलभले यांनाही हौसेखातर बैल सांभाळण्याचा छंद आहे. संग्रामला खास जोड लावण्यासाठी सय्यद वरवडे (ता. मोहोळ) येथील नवनाथ कोरे यांच्याकडील हुबेहूब दिसणारे खिलार खोंड त्यांनी 25 हजार रुपयांना नुकतेच विकत आणले आहे. त्याचे नाव "सम्राट' ठेवले आहे. त्यांना सीना नदीवर बागाईत असलेली 12 एकर शेती असून त्या 12 एकरात संपूर्ण उसाचे पीक आहे. त्यामुळे या खोंडांना शेतातील कसलेच काम नाही. शेतातील सर्व कामे ट्रॅक्टरने करून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ हौस म्हणून खिलार खोंड पाळणाऱ्या व त्याचा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या राहुल भलभले या शेतकरी पुत्राचे व त्याचे वडील सुभाष भलभले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मी वाढदिवसाचे फोटो फेसबुकवर टाकले होते, ते पाहून राज्यभरातून "हे खोंड मागेल ती किंमत आम्ही देऊ तो आम्हाला विकत पाहिजे,' असे अनेक फोन आले. मात्र हा खोंड आम्हाला विकायचा नाही म्हणून मी सांगितले आहे.
- राहुल भलभले,
घाटणे, ता. मोहोळ
संपादन : श्रीनिवास दुध्याल