"दामिनी'मुळे भयमुक्‍त वावरू लागल्या मुली ! ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2020 पर्यंत मिटवले 450 तंटे 

Damini
Damini

सोलापूर : शाळा, कॉलेजबाहेर टपोऱ्यांचा वावर, शिक्षण घेण्याकरिता आलेल्या मुलींमध्ये पसरलेली भीती, कॉलेज परिसरातील भीतिदायक वातावरणातून मुलींना भयमुक्‍त करण्यात दामिनी पथकाचा मोलाचा वाटा राहिला आहे. ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2020 या काळात शहरातील पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत "दामिनीं'नी तब्बल साडेचारशे प्रकरणांवर यशस्वी तोडगा काढला. 

मुली तथा महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आणि कौटुंबिक छळ असो की बाहेर फिरताना येणाऱ्या अडचणींवेळी त्यांना तत्काळ मदत मिळावी, या हेतूने 2016 मध्ये दामिनींची नियुक्‍ती केली. तरुण तथा पुरुषांना वारंवार समज देऊनही तरुणींना तथा महिलांना त्रास देणाऱ्यांवर न्यायालयाच्या माध्यमातून नोटीस बजावली जाते. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाते. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत दामिनी पथकाची तत्काळ मदत मिळते. घटनास्थळी पोचण्यासाठी विलंब होत असल्यास संबंधित पोलिस ठाण्यातील बिट मार्शलची मदत घेतली जाते. दरम्यान, त्रास होणारी मुलगी स्पष्टपणे बोलू शकत नाही, त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन केले जाते. 

जोडभावी पेठ परिसर, गुरुनानक नगर ते कृषी उत्पन्न बाजार समिती या परिसरातील शाळा, महाविद्यालयांबाहेरील वातावरण आता भयमुक्‍त झाल्याची आठवण दामिनींनी कथन केली. अनेक मुली, महिलांच्या प्रश्‍नांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याने त्या अजूनही कॉल करून बोलतात, असेही त्यांनी सांगितले. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे काम उत्तम प्रकारे सुरू असून, शाळा- महाविद्यालयांमध्ये दरवर्षी प्रबोधनपर कार्यक्रम राबविले जातात, असे पोलिस उपनिरीक्षक ज्योती कडू यांनी सांगितले. 

दामिनी पथकातील "या' आहेत नवदुर्गा 
ज्योती कडू (पोलिस उपनिरीक्षक), पौर्णिमा चौगुले (सहाय्यक पोलिस निरीक्षक), रूपा माशाळ, भाग्यश्री केदार, नीलावती इमडे, शरावती काटे, मीनाक्षी नारंगकर, रत्ना सोनवणे, ज्योती शेरखाने. 

ठळक बाबी... 

  • शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत सात दामिनींची नियुक्‍ती 
  • सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत शहरातील शांतता, सुव्यवस्थेला दामिनींकडून प्राधान्य 
  • शाळा, कॉलेजमध्ये जाऊन प्रबोधनपर कार्यक्रमांमधून मुलींना दिले स्वसंरक्षणाचे धडे 
  • दामिनींमुळे शाळा, महाविद्यालयांबाहेरील टपोऱ्यांची कमी झाली संख्या 
  • 100 आणि 1091 या क्रमांकावर संपर्क केल्यास दामिनी करतात दहा मिनिटांत मदत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com