पत्नीच्या निधनानंतर अर्ध्या तासात पतीचे निधन ! येवतीच्या गोडसे कुटुंबाने केले शेतात अस्थिविसर्जनासह वृक्षारोपण

भीमाशंकर राशीनकर 
Tuesday, 17 November 2020

येवती (ता. मोहोळ) येथे सुमन गोडसे यांचे शुक्रवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. या निधनाच्या धक्‍क्‍याने अवघ्या अर्ध्या तासात पती ह. भ. प. हनुमंत गोडसे यांचेही निधन झाले. दोघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसराही रविवारी बरोबरच पार पडला. पण हा तिसरा पुरोगामी विचारातून कर्मकांड न करता व अस्थी पारंपरिक पद्धतीने कुठेतरी नदीमध्ये टाकून प्रदूषण न करता त्या अस्थी ज्या शेतात आयुष्यभर त्यांनी काम केले तेथेच विसर्जित करण्याचा निर्णय गोडसे कुटुंबाने घेतला. 

अनगर (सोलापूर) : येवती (ता. मोहोळ) येथे सुमन गोडसे यांचे शुक्रवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. या निधनाच्या धक्‍क्‍याने अवघ्या अर्ध्या तासात पती ह. भ. प. हनुमंत गोडसे यांचेही निधन झाले. ही घटना चटका लावणारी होती. दोघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसराही रविवारी बरोबरच पार पडला. पण हा तिसरा पुरोगामी विचारातून कर्मकांड न करता व अस्थी पारंपरिक पद्धतीने कुठेतरी नदीमध्ये टाकून प्रदूषण न करता त्या अस्थी ज्या शेतात आयुष्यभर त्यांनी काम केले तेथेच विसर्जित करण्याचा निर्णय गोडसे कुटुंबाने घेतला. 

त्याचबरोबर दीपावली तोंडावर असल्याने 13 दिवसांऐवजी तीन दिवसात सुतक संपविले. या क्रांतिकारी निर्णयाचे गावकरी व नातेवाईक मंडळींनी स्वागत केले. 

याबाबत मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मनोजकुमार मोरे म्हणाले, गोडसे हे येवती गावातील पहिले कुटुंब आहे, ज्यांनी या विचारांची सुरवात आपल्या घरापासून केली आहे. हे स्वागतार्ह आहे. अमावस्येला शिवराय शत्रूवर हल्ला करायचे. त्यामुळे शुभ-अशुभ न मानता त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा गोडसे कुटुंबीयांच्या वतीने जपला जात आहे. 

ते पुढे म्हणाले, हा क्रांतिकारी निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ बंधू रामलिंग गोडसे, मुलगा महेश गोडसे, मुकेश गोडसे, मुलगी सविता, पुतणे कुमार गोडसे, किशोर गोडसे, यश गोडसे, प्रवीण गोडसे, गणपत गोडसे, संताजी गोडसे, निखिल गोडसे, डॉ. अमरजित गोडसे, शरद गोडसे, राजाभाऊ नरके या घरातील मंडळींनी तसेच भावकीतील ज्येष्ठ, जावई, मित्र, नातेवाईक यांनी या उपक्रमाला संमती दिल्यामुळे हा उपक्रम करणे शक्‍य झाले. हा शिवधर्म पद्धतीचा विधी वडवळ येथील सखाराम महाराज यांनी पार पाडला. साध्या पद्धतीने आणि विनाखर्च विधी पार पडला. या उपक्रमाची सध्याच्या काळात गरज असल्यामुळे सर्वांनी याचे कौतुक केले आणि पुढे या विचारांना रुजविण्याचे मान्य केले. 

याबाबत महेश गोडसे म्हणाले, आमच्या आई- वडिलांच्या अकाली निधनाने आम्ही दुःखात बुडालो. मात्र कर्मकांड न करता आज त्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या अस्थी आमच्याच शेतात ठेवून वृक्षारोपण केले आहे. हे झाड आम्हाला त्यांची आठवण सदैव देत राहील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Godse family of Yevati immersed the bones of their parents in the field