माढ्यात दरोडा; महिला जखमी, १६ तोळे सोने लंपास

किरण चव्हाण
Wednesday, 22 January 2020

शहरातील इंदिरा चौक परिसरात राहणाऱ्या कुमार चवरे यांच्या ‌घरी बुधवारी पहाटे अज्ञात दरोडेखोर घुसले. चाकूचा धाक दाखवून सोने चोरून नेले. यावेळी दरोडेखोरांनी घरातील एका महिलेला मारहाण केली असून यात महिला जखमी झाली आहे.

माढा (सोलापूर) : माढ्यात बुधवारी (ता. २२) पहाटे कुमार चवरे व मिठू वाघ यांच्या घरावर दरोडा टाकून सुमारे १६ तोळे सोने व रोख रक्कम असा ऐ्वज दरोडेखोरांनी चोरला. या प्रकारात एक महिला जखमी झाल्याची माहिती माढ्याचे पोलिस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी दिली. याबरोबर माढयातील सराफ गल्लीतही चोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत श्री. खारतोडे यांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील इंदिरा चौक परिसरात राहणाऱ्या कुमार चवरे यांच्या ‌घरी बुधवारी पहाटे अज्ञात दरोडेखोर घुसले. चाकूचा धाक दाखवून सोने चोरून नेले. यावेळी दरोडेखोरांनी घरातील एका महिलेला मारहाण केली असून यात महिला जखमी झाली आहे. मिठू वाघ यांच्या कुर्डुवाडी रस्त्यावरील रोकडोबा मंदिराशेजारील घरातील रोख रक्कम व अंदाजे दोन तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. याबाबत माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चोरीस गेलेले सोने व रोख याबाबत नेमकी माहिती पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी तातडीने श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ञांना पाचारण केले आहे. श्वान पथक सध्या दरोडेखोरांचा मागोवा घेत आहे. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून माढयात चोऱ्या व दरोडयांचे सत्र वाढले आहे. माढयात यापूर्वी सन्मतीनगर व श्नीरामनगर भागत दिवसा चोऱ्या झाल्या होत्या. त्यामुळे या दरोड्याचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. माढा परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold was stolen by robbing a house in Madha