बळीराजासाठी खुषखबर...! कर्जमाफीतील 14 लाख लाभार्थींच्या याद्या तयार 

तात्या लांडगे
गुरुवार, 21 मे 2020

नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान 50 हजार
राज्यातील सुमारे 19 लाख शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून आत्तापर्यंत सुमारे 13 हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित 14 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सहकार विभागाने तयार केल्या आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने याद्या अपलोड झालेल्या नाहीत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून सरकारच्या आदेशानुसार काही दिवसांत या याद्या अपलोड करून संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. तर नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याच लवकरच आदेश निघेल. 
- डॉ. आनंद जोगदंड, अप्पर आयुक्त, सहकार 

सोलापूर : ठाकरे सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी दोन लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले राज्यातील 33 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. त्यापैकी सुमारे 19 लाख शेतकऱ्यांना 13 हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित 14 लाख शेतकऱ्यांच्या याद्या सहकार विभागाने तयार केल्या असून लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणीकरणाचे काम होऊ शकलेले नाही. काही दिवसात ते काम पूर्ण करून लाभार्थ्यांच्या याद्या अपलोड केल्या जाणार आहेत. 

राज्यात एक कोटी 53 लाख खातेदार असून त्यापैकी एक कोटी आठ लाख खातेदार शेतकऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या बॅंकेचे कर्ज उचलले आहे. सद्यस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल एक लाख 23 हजार कोटींपर्यंत कर्ज आहे. त्यामध्ये सुमारे 44 लाख शेतकरी नियमित कर्जदार आहेत. सुरुवातीला छोटी वाटणारी संख्या खूप मोठी असल्याने त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा झाली. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आता या शेतकरी लाभार्थ्यांनी कर्जमाफीच्या लाभासाठी जून अखेर त्यांच्याकडील कर्ज बॅंकेत भरणे आवश्‍यक आहे. त्यानंतर या शेतकऱ्यांना सरकार कर्ज काढून कर्जमाफीचा लाभ देईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

मेपर्यंत कर्जमाफी संपवायचे होते नियोजन 
जिल्हा बॅंकांचे शेती कर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅंकांची शेती कर्जाची थकबाकी कमी व्हावी, तर दुसरीकडे कर्जदार शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील बोजा कमी होऊन त्यांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळावे, या हेतूने महाविकास आघाडी सरकारने मे 2020 पर्यंत महात्मा फुले कर्जमाफी शेतकरी योजना संपविण्याचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे कर्जमाफी लांबणीवर पडली आहे. तरीही संकटातील बळीराजाला आधार देण्यासाठी आता सहकार विभागाने उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या असून कोरोना या विषाणूच्या संसर्गाची स्थिती पाहून काही दिवसांत याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे नियोजन झाल्याचे सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmar Lists of 14 lakh debt waiver beneficiaries prepared