शेतकऱ्यांसाठी खूषखबर; शेतकरी कर्जमाफीचे पोर्टल सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

बॅंकांना कर्ज देण्याचे आदेश 
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पेरणीकरिता कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व बॅंकांना देण्यात आल्या आहेत. कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांविषयी शेतकऱ्यांनी तक्रार द्यावी. संबंधित बॅंकांविरोधात वरिष्ठांच्या सूचनांनुसार कारवाई केली जाईल, असे सहायक निबंधक श्री. तांदळे यांनी सांगितले. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना पार्श्‍वभूमीवर बंद असलेले महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे आधार प्रमाणीकरण पोर्टल आजपासून पुन्हा सुरू केले आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेतले आहे. पोर्टल सुरू झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण घ्यावे, असे आवाहन सहायक निबंधक एम. एस. तांदळे यांनी आज "सकाळ'शी बोलताना केले. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजने अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेती कर्ज माफ करण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेसाठी पंढरपूर तालुक्‍यातील 15 हजार 79 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 14 हजार 54 शेतकऱ्यांना कर्जमाफीस मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत 13 हजार 624 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. त्यापैकी 13 हजार 11 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. 
या शेतकऱ्यांचे 117 कोटी 72 लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. उर्वरित 430 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू होते. दरम्यान, कोरोनाने मार्चपासून कर्जमाफी संदर्भातील आधार प्रमाणीकरणाचे पोर्टल शासनानेच बंद ठेवले होते. तीन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. त्यानंतर आता कर्जमाफीचे पोर्टल आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmers start of Farmers lone Waiver Portal