
सोलापूर : महाराष्ट्रातील 11 अकृषी विद्यापीठांपैकी बहुतांश विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षेची सोय उपलब्ध नसल्याने पदवी व पदविकाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्स ठेवून घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने उच्च महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्रावरील बेंच, वर्गखोल्या व कॉम्प्युटरची माहिती तातडीने मागविली आहे. तर दुसरीकडे लॉक डाऊन वाढल्याने आणि सर्वच विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षेची पुरेशी सोय उपलब्ध नसल्याने प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील गुणांच्या सरासरीनुसार पुढच्या सत्रात ढकलण्याचा निर्णय सद्यस्थितीत योग्य असल्याचे राज्यपाल नियुक्त समितीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कळविण्याचे समितीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने नियुक्त केलेल्या समितीने अहवाल नुकताच आयोगाला सादर केला. त्यानुसार आता प्रत्येक राज्यांमध्ये परीक्षेच्या नियोजनाला वेग आला आहे. महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांमधील सुमारे साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये 50 लाख विद्यार्थी असून कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा 31 जुलैपर्यंत घेणे अशक्य असल्याचा सूर आता बहुतांश विद्यापीठांच्या कुलगुरूंमध्ये निघू लागला आहे. या पार्श्वभूमीवर समितीने आता राज्यातील प्रत्येक विद्यापीठांच्या कुलगुरूंसह प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांकडून परीक्षेसंदर्भात फीडबॅक मागविला आहे. दोन दिवसांत प्रत्येक विद्यापीठांची परीक्षेची तयारी, परीक्षेसंदर्भात केलेले नियोजन व अडचणींची माहिती राज्यपाल नियुक्त समितीने मागवली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रेड, ऑरेंज व ग्रीन झोन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा कशाप्रकारे घ्यायची, याचे नियोजन ठरणार आहे. तत्पूर्वी, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठसंलग्न सर्व महाविद्यालयांमधील बेंच, उपलब्ध वर्गखोल्या व कॉम्प्युटरची माहिती तत्काळ मागविली आहे. त्यामुळे आता पदवी व पदविकाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा योग्य ती खबरदारी घेऊन सोशल डिस्टन्स ठेवून घेण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. 1) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल नियुक्त समिती सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यातील सर्व सर्व कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांचा फीडबॅक घेऊन दोन दिवसांत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील महाविद्यालयीन परीक्षेच्या नियोजनाचा अंतिम अहवाल द्यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी समितीला केल्या. दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढविल्याने प्रात्यक्षिक परीक्षा कशा घ्यावयाच्या, असा नवा पेच विद्यापीठांपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त समितीला अंतिम अहवाल देण्यास विलंब होत असल्याचे समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
परराज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न
महाराष्ट्रातील काही विद्यापीठांमध्ये परराज्यातील तथा परदेशातीलही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची परीक्षा कशाप्रकारे घ्यावी, याचाही निर्णय दोन दिवसांत होणार आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून राज्यपाल नियुक्त समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परीक्षेचे नियोजन केले आहे. पदवी व पदविकाच्या अंतिम वर्षातील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. तर राज्यातील सर्व कुलगुरूंसह प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांच्या फीडबॅकनुसार प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय राज्यपाल नियुक्त समिती घेईल.
- डी. बी. शिंदे, सदस्य, राज्यपाल नियुक्त समिती
सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात थेट प्रवेश देण्याचा पर्याय उत्तम
राज्यातील सुमारे साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये पदवी व पदविकाच्या प्रथम व द्वितीय वर्षात सुमारे 30 लाख विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रश्नपत्रिका पोहोच करणे, सोडवलेल्या उत्तरपत्रिका संबंधित विषयाच्या प्राध्यापकांपर्यंत पोहोच करणे व अंतिम निकाल जाहीर करणे सोयीचे नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नसून त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाइलही नाहीत. या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी देण्याचा विचार आता मागे पडला आहे. दुसरीकडे विद्यापीठांमध्ये ऑनलाइनची पुरेशी व दर्जेदार व्यवस्था नसल्याने या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य असल्याचेही अनेक कुलगुरूंनी यापूर्वीच समितीला सांगितले आहे. तर कोरोनाच्या धाकधुकीत या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्रांवर घेणे शक्य नसल्याचा सूरही आता निघू लागला आहे. लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढल्याने 16 ते 31 मेपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा कशी घ्यायची, असा नवा पेच आता उभा राहिला आहे. त्यामुळे मागील गुणांची सरासरी विचारात घेऊन पदवीच्या प्रथम व द्वितीय तर पदविकाच्या प्रथम वर्षातील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट प्रवेश देणे, हाच पर्याय योग्य असल्याचे अनेक कुलगुरू, प्राध्यापक, सिनेट सदस्य व विद्यार्थ्यांनी समितीला सांगितले आहे. त्यामुळे प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना यंदा पुढील वर्गात (सत्र) प्रवेश देण्याचा निर्णय समितीच्या विचाराधीन असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र, जे विद्यार्थी यापूर्वीच्या सेमिस्टरमध्ये काही विषयांत नापास झालेले आहेत. ते विद्यार्थी आगामी सेमिस्टरमध्ये त्या विषयात उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही, असाही निर्णय होण्याची दाट शक्यता समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.