सोलापूरकरांसाठी खुषखबर ! शहरात दहा ठिकाणी फ्लू केंद्रे

तात्या लांडगे
Tuesday, 21 April 2020

ठळक मुद्दे ...

 • सर्दी, कोरडा खोकला, ताप, कफ, धाप असले त्यांची होणार मोफत तपासणी
 • सोलापूर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी केली शहरातील दहा ठिकाणी वैद्यकीय तपासणीची व्यवस्था
 • पोलिस आयुक्तालय, महापालिकेतर्फे पोस्टरद्वारे केली जाणार घरोघरी जनजागृती
 • लक्षणे असलेल्यांनी स्वतःहून यावे पुढे ; स्वत: बरोबर कुटुंबाचीही काळजी घेत सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे आवाहन
 • विषाणू विरुध्दचा लढा डॉक्टरांच्या माध्यमातून होईल यशस्वी ; सर्वांच्या योगदानाची देशाला गरज

 

सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील ५४० कर्मचाऱ्यांद्वारे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. तत्पूर्वी, सर्दी, ताप, खोकला, कफ व धाप असलेल्यांच्या तपासणीसाठी शहरात १o ठिकाणी फ्लू केंद्रे उभारून सोय करण्यात आली आहे.
कोरोनापासून ११ एप्रिलपासून दूर असलेले सोलापूर आता रेड झोनमध्ये आहे. २५ पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तपासणी सुरूच आहे. आतापर्यंत पाच्छा पेठ, रविवार पेठ, ७० फूट रोड (इंदिरा नगर), बापूजी नगर, कुर्बान हुसेन नगर, भद्रावती पेठ, शेळगी या परिसरातील सुमारे १० हजार घरांमधील नागरिकांची तपासणी घरोघरी जावून करण्यात आली, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शहरातील २५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मोबाईलवरून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती ताब्यात घेतल्या आहेत. 

विषाणू सोलापुरात पोहचलाच कसा; कोडे उलगडेना
लॉकडाउन जाहीर होऊन २१ दिवस झाल्यानंतर सोलापुरात कोरोनाचे रुग्ण सापडले. नाकाबंदी, सीमा बंदीसह अन्य उपाययोजना करूनही कोरोना हा विषाणू सोलापूरमध्ये पोहचलाच कसा याचे कोडे जिल्हा प्रशासनास अद्याप उलगडलेले नाही. दरम्यान, पाच्छा पेठेतील त्या महिलेच्या पतीपासून हा विषाणू पसरल्याचा अंदाज पोलिसांनी महापालिका आरोग्य विभागाच्या माहितीवरून व्यक्त केला आहे. त्याबाबतीत सखोल पडताळणी सुरु असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी पोलिस आयुक्त अंकूश शिंदे व महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यावर सोपवली आहे.  

शहरातील १० फ्लू केंद्रे

 • जिजामाता केंद्र (कन्ना चौक)
 • भावनाऋषी केंद्र (अशोक चौक)
 • रामवाडी केंद्र (शासकीय गोदाम जवळ)
 • जोडभावी पेठ केंद्र (मंगळवार पेठ)
 • विडी घरकूल केंद्र ( संभाजी शिंदे शाळेजवळ)
 • दाराशा केंद्र (मॉडर्न हायस्कूल)
 • सोरेगाव केंद्र (सोरेगाव गावठाण)
 • मजरेवाडी केंद्र (जिल्हा परिषद शाळेजवळ)
 • नई जिंदगी केंद्र (बलदवा हॉस्पिटलजवळ)
 • देगाव नागरी आरोग्य केंद्र (जिल्हा परिषद शाळेसमोर)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for Solapurukar Flu test centers in ten places in the city