esakal | "गोपीनाथ मुंडे विचार' विसरणार नाही, असे कोण म्हणाले
sakal

बोलून बातमी शोधा

gopinath mundhe

जानकर सर्वात हिट 
व्याख्यानमालेला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पाच दिवसांत जवळपास तीन लाख नागरिकांनी हे फेसबुक लाइव्ह व्हिडीओज पाहिले आहे. या सर्व व्याख्यानात महादेव जानकर यांचे फेसबुक लाइव्ह सर्वात लोकप्रिय ठरले असून अनेक नागरिकांनी त्यांचा संवाद ऐकला आहे. 

"गोपीनाथ मुंडे विचार' विसरणार नाही, असे कोण म्हणाले

sakal_logo
By
अलताफ कडकाले

सोलापूर : गोपीनाथ मुंडे ही व्यक्ती नसून तो एक विचार होता, ज्याप्रमाणे देशात राम मनोहर लोहिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही जिवंत आहेत, त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे यांचा विचार कायम जिवंत असेल व ते ठेवण्याचे काम महादेव जानकर आयुष्यभर करेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लोकनेता राज्यस्तरीय व्याख्यानमालेत केले. 

यांनी मांडले विचार 
वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून "लोकनेता राज्यस्तरीय व्याख्यानमाला, आठवणीतले मुंडे साहेब' आयोजित करण्यात आली होती. ही व्याख्यानमाला 31 मे ते 4 जूनपर्यंत फेसबुकवर ऑनलाइन घेण्यात आली. या व्याख्यानमालेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, राज्यसभा खासदार भागवत कराड, शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार सुजितसिंह ठाकूर, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, कीर्तनकार सुदाम महाराज पानेगावकर, शिवशाहीर बंडू खराटे यांनी विचार मांडले. 

बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे : 
लोकनेता व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे बहुजन नागरिकांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी व नामांतर चळवळीत कशा पद्धतीने काम होते यावर प्रकाश टाकला. दुसरे पुष्प शिवसेना नेते व माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी गुंफले. 1995च्या युती शासना काळात मुंडे साहेबांसोबत काम करताना आपल्या आठवणी नागरिकांसमोर मांडल्या. हे मांडताना ते भावुक झाले होते. 

ब्रेकिंग : आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील 400 मठ दोन महिन्यांसाठी बंद

आमदार रत्नाकर गुट्टे : 
तिसरे पुष्प आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गुंफले. गोपीनाथ मुंडे यांच्या उजनी येथील जिल्हा परिषद निवडणुकीपासून, आमदार, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, खासदार व नंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्री अशा शेवटच्या श्‍वासापर्यंत सोबत असलेले रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. रत्नाकर गुट्टे आज जे आहेत ते फक्त गोपीनाथ मुंडेंमुळे अशा प्रकारची आदरांजली त्यांनी वाहिली. 

सुदाम पानेगावकर : 
चौथ्या दिवशी सकाळी सुदाम महाराज पानेगावकर यांनी जालना येथील गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मुंडे साहेब परत या हे भावनिक प्रवचन केले. त्यानंतर शिवशाहीर बंडू खराटे यांनी शाहिरी पद्धतीने मुंडे साहेबांना आदरांजली वाहिली. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुंडे साहेबांसोबतच्या आपल्या काही आठवणींना यावेळी उजाळा दिला. 

हेही वाचा : तेथे पावसाच्या आधीच फसताहेत वाहने -

रासप अध्यक्ष महादेव जानकर : 
सायंकाळी सहा वाजता बहुप्रतिक्षित असा संवाद महादेव जानकर यांचा होता. पहिल्याच दिवशी जवळपास 30 हजार नागरिकांनी हा संवाद लाइव्ह पाहिला. त्यांनी मुंडे साहेबांसोबतच्या अनेक आठवणी जागवल्या. मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना देशभर लालूप्रसाद, मुलायमसिंग यादव यांच्या भूमिकेला गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातून प्रतिसाद दिला, तेव्हापासून मी त्यांच्यावर प्रेम करू लागलो. त्यांना आपला नेता मानलं. आयुष्यात गोपीनाथ मुंडे यांना व त्यांच्या मुलींना कधीही विसरणार नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांच्यासोबत राहील, असे विचार त्यांनी मांडले. 

खासदार भागवत कराड : 
या व्याख्यानमालेतील शेवटचा संवाद खासदार भागवत कराड यांचा होता. गोपीनाथ मुंडे हे केवळ एका समाजाचे नसून महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजात लोकप्रिय असल्याने खऱ्या अर्थाने लोकनेता होते. अनेक कुटुंबाचे ते पालक होते. मागील सहा वर्षांत असा एकही दिवस जात नाही जेंव्हा त्यांची आठवण येत नाही. अशा प्रकारची आपली भावना व्यक्त केली. राज्य कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे यांनी व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या मान्यवरांचे शेवटी आभार मानले. 

वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य
वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून 4 मे ते 4 जून असा महिनाभर अनेक प्रश्‍नांवर जवळपास 30 मान्यवरांचा संवाद आयोजित केला होता. त्यात कला, क्रीडा, कृषी, राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी आपले विचार मांडले. राज्यातील पाच लाख नागरिकांनी आतापर्यंत हे सर्व फेसबुक लाइव्ह संवाद पाहिले आहेत. त्याची नोंद वंजारी सेवा संघ फेसबुक पेजवर आहे. 

यांनी घेतले यशस्वितेसाठी परिश्रम 
लोकनेता व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी राहुल जाधवर (बार्शी), विठ्ठलराव गीते (लातूर), बाजी दराडे (पुणे), देवेंद्र बारगजे (जालना), अमोल कुटे (मुंबई), प्रकाश आव्हाड (नाशिक), डॉ. मंजूषाताई दराडे (नाशिक), भाऊसाहेब घुगे (जालना), धनंजय ओंभासे (सातारा), नितीन सांगळे (पुणे), संतोष ताठे (औरंगाबाद), भाऊसाहेब मिसाळ (बीड), दीपक दराडे (जालना), सुदाम घुगे (बदलापूर), डॉ. नारायण जायभाय (पुणे), सुधीर केंद्रे (लातूर), प्रा. गजानन घुले, दीपक घुगे (बुलडाणा), किशोर पाटील (जळगाव), संदीप हुशे, भागवत डोईफोडे, नितीन कायंदे, बालाजी कायंदे, जयराम गीते, संतोष डोईफोडे, विशाल पाटील 
यांनी परिश्रम घेतले.