
13 हजार 600 कोंबड्यांची विल्हेवाट
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील 11 हजार 80 तर परभणी जिल्ह्यातील 2 हजार 520 कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
सोलापूर : बर्ड फ्लूमुळे मृत पावलेल्या कोंबड्यांना, नष्ट केल्या जाणाऱ्या कोंबड्यांना शासनाने मदत जाहीर केली आहे. गावराण कोंबडीला 90 रुपये, दोन महिन्यांवरील ब्रायलर कोंबड्यांना 70 रुपये, दोन महिन्यांच्या आतील पिल्लांना 20 रुपये या प्रमाणे मदत केली आहे. नष्ट केल्या जाणाऱ्या अंड्यांसाठी प्रति अंडे तीन रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री भरणे म्हणाले, महाराष्ट्रात लातूर आणि परभणी या दोन जिल्ह्यातच बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, या ठिकाणी, कावळे, बगळे आणि पोपटांचा मृत्यू झाला आहे. या मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. बर्ड फ्लू बद्दल पसरविल्या जाणाऱ्या आफवांवर विश्वास ठेवू नये. चिकन शिजवून खाल्ल्यास कसलाही धोका नसल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात सध्या 27 लाख कोंबड्या आहेत. त्यामध्ये अंडी देणाऱ्या 18 लाख कोंबड्या आहेत. ब्रॉयलरच्या 9 लाख कोंबड्या सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात असून जिल्ह्यातील सर्वच पाणवठ्यांवर वन विभागाच्यावतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. चिकन विक्रेत्यांवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये पथकांची स्थापना करण्यात आली आहे.