कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार 

भारत नागणे 
Saturday, 21 November 2020

येत्या 26 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : येत्या 26 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. 

सध्या पुणे विभागात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक होत असल्याने आचारसंहिता लागू आहे. यामुळे कार्तिकीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार? याकडेच वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, निवडणूक आयुक्तांनी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. 

वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदाची कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने रद्द केली आहे. यात्रा काळात पंढरपुरात भाविकांनी गर्दी करू नये यासाठी 25 व 26 नोव्हेंबर या दोन दिवशी शहर व परिसरातील आठ गावांमध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे. याशिवाय 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि बाहेरून शहरात येणारी एसटीची वाहतूक देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालख्या आणि दिंड्यांना यात्रा काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहर व परिसरातील सुमारे 350 मठ बंद ठेवण्यात येणार आहेत. 

गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मुखदर्शनासाठी उघडण्यात आले आहे. पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन दर्शन बुकिंग सुरू आहे. दररोज दोन हजार भाविकांना ऑनलाइन दर्शन पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र यात्रा काळात ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. 

कार्तिकी खिलार जनावरांचा बाजारही रद्द 
कार्तिकी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला येथील खिलार जनावरांचा बाजारही रद्द करण्यात आला आहे. कार्तिकी खिलार जनावरांच्या बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशसह राज्याच्या विविध भागांतून जातिवंत खिलार जानवरे मोठ्या संख्येने विक्रीसाठी येतात. बाजारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. कोरोनामुळे या वर्षीचा खिलार जनावरांचा बाजार भरणार नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Mahapuja of Vitthal-Rukmini on Karthiki Ekadashi will be performed by Deputy Chief Minister Ajit Pawar