कृषी विभागालाच नाही शासनाच्या विविध योजनांची माहिती! शेतकरी मात्र संभ्रमावस्थेत

राजकुमार शहा
Wednesday, 14 October 2020

सध्या पावसाळा सुरू असल्याने फळबाग लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. शेतकऱ्याचे सध्या डाळिंब, पेरू, द्राक्ष, सिताफळ, आंबा या फळबागांची लागवड करण्याकडे कल आहे.

मोहोळ (सोलापूर) : येथील शासनाच्या कृषी विभागाला शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहितीच नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. कृषी विभाग पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत फळबागा लागवडीविषयी संभ्रम सुरू आहे. कृषी विभागालाच जर माहिती नसेल तर मग अधिकारी नेमके करतात तरी काय? अशी चर्चा शेतकऱ्यात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीपासून वंचित राहून त्याचे नुकसान होणार आहे.

सध्या पावसाळा सुरू असल्याने फळबाग लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. शेतकऱ्याचे सध्या डाळिंब, पेरू, द्राक्ष, सिताफळ, आंबा या फळबागांची लागवड करण्याकडे कल आहे. कै पांडुरंग फुंडकर फळबाग लगावड योजना, रोजगार हमी योजना या योजनेतून फळबागांची लागवड करावी जेणे करून दोन्ही योजनेतून एखाद्या योजनेचा तरी लाभ घेता येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

कै पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेतून शासनाने फळबाग लागवडीसाठी परवानगी दिली नसून ही योजना सुरूच नाही असे अधिकारी सांगत आहेत, तर दुसरीकडे खाजगी नेट कॅफे चालक कृषी यांत्रिकीकरण, फुंडकर फळबाग लागवड योजना, तसेच इतर योजनांचे फॉर्म ऑनलाइन भरून घेत आहेत. शासनाचे अधिकारी म्हणतात योजना सुरूच नाही तर खाजगी नेट कॅफे चालक या योजनेचे फॉर्म भरून  घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमका विश्वास कुणावर ठेवायचा हा मोठा अडचणीचा प्रश्न आहे.

योजना सुरु नसेल तर मग खाजगी नेट कॅफे चालक कुठल्या आधारावर फॉर्म भरून घेतात, याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता टोलवा टोलवीची व असमाधानकारक उत्तरे मिळतात. मोहोळ तालुक्यातील कृषी विभागाच्या या अनागोंदी कारभाराकडे जिल्ह्यातील वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना कुठलेच गांभीर्य दिसत नाही. कृषी सहाय्यक गावात येत नाहीत. आलेच तर दुपारी येतात. सध्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची कामे सुरू असल्याने कृषी सहाय्यक कधी आला व कधी गेला हेच शेतकऱ्यांना समजत नाही.

पेनूरचे मंडल अधिकारी सुर्यकांत मोरे म्हणाले, मी वरीष्ठांना फोन लाऊन विचारतो, सर्वच योजनांचे फॉर्म नेटकॅफे चालक भरून घेताहेत. भरलेले फॉर्म स्वीकारायचे की नाही हा शासनाचा विषय आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The governments agriculture department in Mohol taluka is not aware of the various schemes available for farmers