"अण्णा, ना निमदे मनशा यिदरी, निवू यानू काळजी माडब्याडरी !' चारपैकी कुठला अण्णा निवडून येणार? 

GP
GP

अक्कलकोट (सोलापूर) : "अण्णा, ना निमदे मनशा यिदरी, निवू यानू काळजी माडब्याडरी ! निमदे पॅनेल बरतादरी, याकअंदर निम्म केलसा भाळ छोलो आदरी !' (अण्णा, मी तुमचाच माणूस आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका, यावेळी तुमचेच पॅनेल निवडून येणार; कारण तुमचे काम खूप चांगले आहे.) असे म्हणत ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी आलेले नेते व कार्यकर्ते यांचे समाधान करण्याचे कसब मतदार साधत आहेत. आता गावातील तीन ते चार पॅनेलच्या अण्णांपैकी मतदार नेमके कोणत्या अण्णांचे आहेत, हे येत्या 15 तारखेला मतदानातून स्पष्ट होऊन अंतिम फैसला हा 18 जानेवारीस होणार आहे. आता "माझं गाव, माझी जबाबदारी' अशी विकासाची अशी हमी प्रत्येकी पॅनेलप्रमुख व उमेदवार देत आहेत. हे जरी खरे असले तरी आता मतदार नेमका विश्वास कोणावर ठेवतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच राजकीय वातावरण तापू लागले. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत नऊ ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध झाल्या; मात्र उर्वरित 63 ग्रामपंचायतींसाठी रणसंग्राम पेटला आहे. एकूण 634 सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यातील नऊ पूर्ण ग्रामपंचायत आणि अनेक गावातील सदस्य असे मिळून 172 जण बिनविरोध झाले असून, काही जागा या रिक्त आहेत तर उर्वरित जागांसाठी निवडणूक होत आहे. आता त्या गावांत बैठका, जेवणावळी, गाठीभेटी व वाडीवस्ती तसेच शिवार बैठका सुरू झाल्या आहेत. 

"मी तुमचाच आहे भाऊ. माझ्याकडे येण्याची काय गरज होती? आम्ही तुमचेच काम करीत आहोत. विजय तुमचाच आहे', असे प्रत्येक उमेदवारास सांगून अनेक जण उमेदवारांची बोळवण करीत आहेत. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्तेही संभ्रमात पडत आहेत. प्रत्येक जण गावपातळीवर "आपलाच विजय आहे' या आविर्भावात फिरत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापले आहे. तालुक्‍यातील 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या बिनविरोध निवडणुकीच्या आवाहनास काही प्रमाणात यश आल्याने, नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत; मात्र तरीसुद्धा मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने तालुक्‍यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तालुक्‍यात आता प्रचाराचा प्रारंभ, नारळ फोडणे, गावातून प्रचारफेरी काढणे, बैठका घेणे, रात्री-अपरात्री गुपचूप विरोधकांच्या गाठीभेटी, याशिवाय जेवणावळींना मोठ्या प्रमाणात सुरवात झाली आहे. अनेकांची भिस्त सोशल मीडियावर आहे. तेथे उमेदवार फोटो व चिन्हे टाकून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. भित्तिपत्रके, बॅनर व पोस्टरबाजीवरही अनेकांनी भर दिला आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मी किंवा आमचे मंडळच कसे चांगले आहे, आमचे नेते कसे चांगले आहेत, याची माहिती कार्यकर्ते व उमेदवार सांगत आहेत. 

मतदान तीन दिवसांवर आल्याने एकही मतदार भेटीशिवाय राहता कामा नये, असे नियोजन बहुतेक गावांत उमेदवारांनी केले आहे. वरिष्ठ पातळीवरून फोन करून नाराज कार्यकर्त्यांना 
समजावून सांगण्यासाठी आता उमेदवार गळ घालत आहेत. 

अक्कलकोट तालुक्‍यात होत असलेल्या लढतीत वागदरी येथे गुंडप्पा पोमाजी, श्रीशैल ठोंबरे आदींच्या श्री परमेश्वर ग्रामविकास पॅनेल विरुद्ध विजयकुमार ढोपरे, रवी वरनाळे यांच्या 
हरहर शंभू परमेश्वर पॅनेल यात तर जेऊर येथे जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन यांचा श्री काशीलिंग ग्रामविकास पॅनेल आणि बंदेनवाज कोरबू, मल्लिकार्जुन बामणे यांचा सर्वधर्म समभाव पॅनेल यात सामना होत आहे. तसेच चपळगाव येथे संजय बाणेगाव, महादेव वाले, नंदकुमार पाटील व शाकिर पटेल यांच्या मल्लिकार्जुन महाविकास पॅनेल विरुद्ध उमेश पाटील, रियाज पटेल, सिद्धाराम भंडारकवठे व बसवराज बाणेगाव यांचा मल्लिकार्जुन ग्रामविकास पॅनेल यात रंगतदार लढत होत आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या गौडगाव बुद्रूक या गावात सरपंच वीरभद्र सलगरे व माजी सरपंच सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटात चुरशीची लढत होताना दिसत आहे. याशिवाय आमदार सचिन कल्याणशेट्टी व त्यांचे पारंपरिक विरोधक विश्वनाथ भरमशेट्टी हे दोघे या वेळी हन्नूर ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत पण सी. एम. बाळशंकर व प्रवीण हताळे व काही तरुण एकत्र येत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलद्वारे आपले नशीब आजमावत आहेत. याचबरोबरीने कुरनूर या गावात या वेळी पहिल्यांदाच चार पॅनेलमध्ये मोठ्या चुरशीने निवडणूक होत आहे. मतदार हे आता यातून कोणाची निवड करतील? याचा अंदाज मात्र येत नाही. व्यंकट मोरे यांच्या हजरत पीर सातू सय्यद शेतकरी पॅनेल, अमर पाटील यांचा जय हनुमान व हजरत पीर सातू सय्यद पॅनेल, बाळासाहेब मोरे यांचा लोकनेते ब्रह्मानंदतात्या मोरे ग्रामविकास पॅनेल, राहुल काळे यांच्या श्री स्वामी समर्थ ग्रामविकास पॅनेलमध्ये चुरशीने लढत होत आहे. याशिवाय नागणसूर येथे श्री गुरू बसवलिंगेश्वर चालक मालक ग्रामविकास पॅनेलचे गिरमला डोंगरीतोट, मल्लिनाथ भासगी व श्री नंदिबसवेश्वर ग्रामविकास पॅनेल, प्रमुख सिद्रामप्पा धानशेट्टी, भिमशा धोत्री आदींच्या दोन गटांत निवडणूक होत आहे. 

येत्या दोन दिवसांत लहान- मोठ्या गावांत निवडणूक ही सत्ताधारी विरुद्ध कामावर समाधानी नसलेले परिवर्तनाचे ध्येय ठेवून लढणारे विरोधक यांच्यात सुरू असलेला गावगाडा संघर्ष मात्र टोकाचा होताना दिसत आहे. पण याचा निर्णय मात्र जो मतदारांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरतो, त्याच्या बाजूने कललेला असेल यात संदेह नाही. 

सरपंचपदाचे आरक्षण हे निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने निवडणुकीतील धार थोडीशी कमी झालेली निवडणुकीपूर्वी प्रचारात दिसत असली, तरी गावचा कारभार आपल्याच हातात पाहिजे, ही अभिलाषा अनेक गाव पुढारी बांधून आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात जोमाने प्रचार सुरू आहे. नवीन तरुण या वेळी गाव ताब्यात यावे यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. पण मुरलेल्या राजकारण्यांकडून मात्र आपले अनुभव व शक्ती पणाला लावून आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी सर्व युक्‍त्या वापरल्या जात आहेत. 

ठळक... 

  • अगदी लहान गावात सुद्धा या वेळी तीन ते चार पॅनेलमध्ये लढती 
  • आता सत्ता सुदंरीला प्रसन्न करण्यासाठी सगेसोयरे व भाऊबंधकी संबंध होत आहेत दुय्यम 
  • गावाच्या विकासापेक्षा व्यक्तिगत राग व लोभ याला निवडणुकीत जास्त प्राधान्य दिले जात आहे 
  • कोरोनाची भीती मनातून पूर्ण काढून टाकत मोठ्या जोशात निवडणुकांना जाताहेत सामोरे 
  • ग्रामपंचायत निवडणुका या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com