
केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या काळामध्ये हॉटेल, ढाबे बंद असल्याने हे व्यावसायिक डबघाईला आले होते. अनलॉकनंतर सर्व काही हळूहळू सुरू झाले असले तरीही हॉटेल व्यवसाय मात्र सलाईनवरच होता. कारण, नागरिक भीतीपोटी बाहेरचे खाणे टाळत होते. पर्यायाने घरचे घरीच नाश्ता व जेवण करीत असत. त्यामुळे हॉटेल व ढाब्यांवर तुरळक प्रमाणात गर्दी होती. परंतु, राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आणि सगळे वातावरणच बदलून गेले. त्यामुळे ग्रामीण राजकारणाला रंग आला व सध्या सगळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मतदानाला आता पाच दिवस शिल्लक राहिल्याने व कोरोनाची भीतीही कमी होत असल्याने गाव पातळीवर एकेका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे खेचाखेचीच्या राजकरणाचा जोर वाढल्याने आपल्या कार्यकर्त्यांबरोबरच नवीन मतदान, मतदार जुळणी करण्यासाठी हॉटेल व ढाब्यावर कार्यकर्त्यांची व मतदारांची रेलचेल वाढली आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे हॉटेल व ढाब्यांना मात्र नवसंजीवनी मिळाली आहे. निवडणूक आयोगाने 7 ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांसाठी 25 हजार रुपये, 11 ते 13 ग्रामपंचायत सदस्यांसाठी 35 हजार रुपये तर 17 सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांसाठी 50 हजार रुपयांपर्यंत उमेदवार खर्च करू शकतो, अशी अट घातली आहे. परंतु, सध्या हॉटेलवरील जेवणावळी, नाश्ता, घोंगडी बैठका, सभा, बैठका, स्पीकर, चहापाणी यावरील खर्च पाहता या खर्चाचा उमेदवार कसा काय मेळ घालणार, हा प्रश्न असला तरी हा प्रश्न मात्र ते निश्चितच सोडवणार आहेत, हे मात्र खरे!
करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून, 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम मात्र रंगला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.