यापुढे चालणार नाही उसाचे राजकारण ! पंढरपूर तालुक्‍यातील साखर कारखान्यांच्या संचालकांना धोबीपछाड 

भारत नागणे 
Tuesday, 19 January 2021

पंढरपूर तालुक्‍यातील 71 ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. अनेक ठिकाणी सत्तांतर झाले तर काही ठिकाणी सत्ता कायम ठेवण्यात स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना आणि ग्रामविकास आघाड्यांना यश आले. परंतु तालुका आणि गाव पातळीवर साखर कारखान्यांच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या कारखान्यांच्या संचालकांना मात्र मतदारांनी चांगलीच चपराख देत उसाचे राजकारण चालणार नाही, हेही यानिमित्ताने दाखवून दिले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : साखर कारखानदारी आणि ग्रामीण राजकारण हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे पंढरपूर तालुक्‍यात समीकरण होते. परंतु, या वेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या समीकरणाला मतदारांनी छेद देत, साखर कारखान्यांच्या जीवावर गावात राजकारण करणाऱ्या सर्वच कारखान्यांच्या संचालकांना व त्यांच्या पॅनेलमधील उमेदवारांना मतदारांनी सपशेल नाकारले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील उसाचे राजकारण संपुष्ठात आल्याचे चित्र आहे. 

पंढरपूर तालुक्‍यातील 71 ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. अनेक ठिकाणी सत्तांतर झाले तर काही ठिकाणी सत्ता कायम ठेवण्यात स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना आणि ग्रामविकास आघाड्यांना यश आले. परंतु तालुका आणि गाव पातळीवर साखर कारखान्यांच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या कारखान्यांच्या संचालकांना मात्र मतदारांनी चांगलीच चपराख देत उसाचे राजकारण चालणार नाही, हेही यानिमित्ताने दाखवून दिले आहे. 

यामध्ये विठ्ठल साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्या चिलाईवाडीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा पार धव्वा उडला आहे. तर "विठ्ठल'चे संचालक विजयसिंह देशमुख यांचा मुलगा उदयसिंह देशमुख यांचा कासेगाव ग्रामपंचायतीमध्ये दारुण पराभव झाला आहे. सुपली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब यलमर यांच्या पॅनेलच्या नऊ उमेदवारांचा पराभव झाला आहे. तर तिसंगी येथील "पांडुरंग'चे संचालक तानाजी वाघमोडे यांच्या पॅनेललाही मतदारांनी नाकारत भालके - काळे गटाकडे सत्ता दिली आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक अण्णा शिंदे यांचाही आंबे ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. 

खेडभाळवणी येथेही वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक बिभीषण पवार यांच्या गटाचा पराभव झाला आहे. सिद्धेवाडी येथे "विठ्ठल'चे संचालक गोकूळ जाधव यांच्या गटाची परिचारक गटाने धुळधाण करत विजय मिळवला आहे. रोपळेतही "सहकार शिरोमणी'चे संचालक दिनकर कदम यांच्यासह त्यांच्या गटाचा मानहानीकारक पराभव झाला आहे. कौठाळीतही याच कारखान्याचे संचालक असलेल्या मोहन नागटिळक गटाचा सुपडा साफ झाला आहे. तर दुसरीकडे करकंब येथे बाळासाहेब देशमुख गटाला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हरी गावंधरे यांच्या पत्नीलाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांची सुस्ते ग्रामपंचायतीवरील 40 वर्षांची सत्ता संपुष्ठात आली आहे. पटवर्धन कुरोलीत बाजार समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे यांच्या गटाचाही पराभव झाला आहे. ओझेवाडीत जिल्हा राष्ट्रवादीत कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी जोर लावूनही त्यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. येथे पंचायत समितीच्या सदस्या जयश्री पंडित- भोसले गटाने पुन्हा सत्ता कायम राखली आहे. 

दरम्यान, भाजप नेते कल्याणराव काळे यांनी वाडीकुरोलीत, भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी खर्डीत एकहाती वर्चस्व कायम राखले आहे. एंकदरीत, ऊस आणि साखर कारखान्याभोवती फिरणाऱ्या गावगाड्यातील राजकारणाला मतदारांनी फटकारत वेगळेपण दाखवून दिले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Gram Panchayat elections in Pandharpur the directors of the sugar factories were defeated