सकाळ इम्पॅक्‍ट ! उपरी येथील 70 अतिक्रमणधारकांना नोटिसा

भारत नागणे
Tuesday, 15 September 2020

येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची जुनी टाकी जीर्ण झाली आहे. जीवन प्राधिकरणाने 43 लाख रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. परंतु, पाण्याची टाकी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडे योग्य जागा उपलब्ध नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हे काम रखडले आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : उपरी (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण केलेल्या 70 लोकांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सरपंच संगीता नागणे यांनी दिली. याबाबत "सकाळ'ने सविस्तर प्रसिद्ध केल्यानंतर अतिक्रमणधारकांवर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या. 

येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची जुनी टाकी जीर्ण झाली आहे. जीवन प्राधिकरणाने 43 लाख रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. परंतु, पाण्याची टाकी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडे योग्य जागा उपलब्ध नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हे काम रखडले आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणाचा मुद्दा समोर आला आहे. 

ग्रामपंचायतीच्या अनेक भूखंडांवर स्थानिक लोकांनी अतिक्रमण केले आहे. पाण्याची टाकी उभारण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले आहे. या संदर्भात सोमवारच्या (ता. 14) "सकाळ'च्या अंकात व "ई-सकाळ'वर सविस्तर बातमी प्रसिद्ध होताच, ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलेल्या 70 लोकांना कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. येत्या आठ दिवसांत अतिक्रमणे काढून घ्यावीत; अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने अतिक्रमणे काढून घेण्यात येईल, असेही नोटिशीत नमूद केले आहे. ग्रामपंचायतीने अतिक्रमणाबाबत कडक भूमिका घेतल्याने रखडलेले पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

याबाबत उपरीच्या सरपंच संगीता नागणे म्हणाल्या, ग्रामचंयातीच्या मोकळ्या जागांवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी योग्य जागा उपलब्ध होत नसल्याने काम थांबले आहे. ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्यासाठी 70 लोकांना नोटिसा दिल्या आहेत. मुदतीत अतिक्रमण न काढल्यास कारवाई करून अतिक्रमणे काढली जातील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Grampanchayat issued a notice of action to the encroachers at Upari