
राज्य शासनाच्या रमाई आवास घरकुल योजनेतील 210 लाभार्थींचा निधी गेल्या वर्षभरापासून रखडला होता. पण अनुदान प्राप्त होताच दहा मिनिटांत 129 लाभार्थींना पहिल्या हप्त्यापोटी 19 लाख रुपये वर्ग करण्यात आले. रमाई आवास घरकुलच्या अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या यामुळे लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंगळवेढा (सोलापूर) : राज्य शासनाच्या रमाई आवास घरकुल योजनेतील 210 लाभार्थींचा निधी गेल्या वर्षभरापासून रखडला होता. पण अनुदान प्राप्त होताच दहा मिनिटांत 129 लाभार्थींना पहिल्या हप्त्यापोटी 19 लाख रुपये वर्ग करण्यात आले. रमाई आवास घरकुलच्या अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या यामुळे लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गोरगरीब व बेघर असलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थींना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. या लाभार्थींसाठी एक लाख 20 हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून देण्यात येते. यासाठी मंगळवेढा तालुक्याला 2019 -20 या आर्थिक वर्षाकरिता 210 लाभार्थींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या लाभार्थींकडून अर्ज घेऊन, त्या अर्जांची छाननी करून विस्ताराधिकारी यांच्या मार्फत स्थळ पाहणी करण्यात आली, जेणेकरून अपात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळू नये याची प्रशासनाने पूर्ण खातरजमा करून त्या लाभार्थींना मंजूर घरकुलाचे करारनामे करून घेण्यात आले. त्यामुळे त्या लाभार्थींनाच घरकुल मंजूर झाले. शिवाय वाढतच चाललेल्या बांधकाम साहित्याचा खर्च विचारात घेता बहुतांश करारनामे केलेल्या लाभार्थींनी आपल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करत निवाऱ्याचा आश्रय घेतला. परंतु, यासाठी केलेल्या कामाचा निधी मिळावा म्हणून पंचायत समितीने वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार केला. परंतु, राज्य शासनाने या मंजूर लाभार्थींना निधीची तरतूद न केल्यामुळे या लाभार्थींना समजावून सांगताना पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना देखील नाकीनऊ आले होते.
उद्दिष्ट दिलेल्या 210 लाभार्थींपैकी 175 लाभार्थींचे करारनामे करण्यात आले. 46 लाभार्थींच्या बॅंक खात्याची पडताळणी होताच अनुदान वर्ग केले जाणार आहे. महा आवास योजनेअंतर्गत पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी यंदाच्या वर्षी मंजूर असलेल्या घरकुलाचे 80 टक्क्यांपेक्षा अधिक जिओ - टॅगिंगची पूर्तता केली आहे.
रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचे मोठे उद्दिष्ट तालुक्याला मिळाले. ते पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीने योग्य नियोजन केले असून, लाभार्थींनी त्याबाबतचे प्रस्ताव पंचायत समितीला न येता ग्रामपंचायतीच्या मार्फत पाठवावेत. पैशाची मागणी होत असेल तर तत्काळ संपर्क करावा.
- प्रेरणा मासाळ,
सभापती, पंचायत समिती, मंगळवेढा
संपादन : श्रीनिवास दुध्याल